अचूक लक्ष्य भेदण्यासाठी संयम आवश्यक-सुवर्णपदक विजेती आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 11:44 PM2018-09-13T23:44:48+5:302018-09-13T23:45:07+5:30

नवोदितांनी नेमबाजी क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर किमान वर्षभर एकाही स्पर्धेत सहभाग घेऊ नये; कारण आपल्यातील उणिवा, गुण, दोष यांच्यावर अभ्यास करणे ही आवश्यक बाब आहे. त्यामुळे नवोदितांनी संयम राखून, सातत्यपूर्ण कष्ट करण्याची तयारी ठेवून नेमबाजीकडे वळले पाहिजे;

World champion Rahi Sarnobat, a medalist-medalist, needed to score an accurate goal | अचूक लक्ष्य भेदण्यासाठी संयम आवश्यक-सुवर्णपदक विजेती आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत

अचूक लक्ष्य भेदण्यासाठी संयम आवश्यक-सुवर्णपदक विजेती आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत

Next


- सचिन भोसले

नवोदितांनी नेमबाजी क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर किमान वर्षभर एकाही स्पर्धेत सहभाग घेऊ नये; कारण आपल्यातील उणिवा, गुण, दोष यांच्यावर अभ्यास करणे ही आवश्यक बाब आहे. त्यामुळे नवोदितांनी संयम राखून, सातत्यपूर्ण कष्ट करण्याची तयारी ठेवून नेमबाजीकडे वळले पाहिजे; तरच यश हमखास मिळते. असे मत ‘लोकमत’शी थेट संवाद साधताना आशियाई स्पर्धेत नेमबाजी २५ मीटर पिस्तल प्रकारात सुवर्णपदक विजेती आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत हिने व्यक्त केले.


प्रश्न : आॅलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविण्यासाठी कशी तयारी सुरू आहे ?
उत्तर : कोल्हापूरच्या दुधाळी शुटिंग रेंजवर शुटिंगचा सराव करताना पहिल्या वर्षभर मी एकही स्पर्धा खेळले नाही; कारण मला स्वत:मधील उणिवा भरून काढावयाच्या होत्या. त्यानंतर २००८ साली राष्ट्रकुल युवा स्पर्धेत सुवर्ण, २०१० मध्ये आयएसएफ विश्वचषक स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून देणारी मी पहिली ठरले. त्याच वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकाविली. २०१४ मध्ये ग्लासगो येथे राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण, त्याचवर्षी इचआॅन आशियाई स्पर्धेत कांस्यपदक मिळविले आणि २२ आॅगस्ट २०१८ ला जाकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. ही पहिली पायरी होती. आता दोन वर्षांच्या कालावधीत अंतिम ध्येय असणार आहे ते २०२० च्या आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे आहे. याकरिता जर्मन प्रशिक्षक मुनिक बयान या सकाळी साडेसहाला माझ्या घरी येतात. सकाळी सात ते सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मी पुणे येथील बालेवाडीच्या शुटिंग रेंजवर सराव करते. हा माझा दिनक्रम आहे. त्यामुळे आॅलिम्पिकमध्ये पदक पटकाविण्यासाठी एवढी कष्ट करण्याची तयारी करीत आहे.

प्रश्न : सुवर्णमयी कामगिरी करण्याचे मनात ठरविले होते का ?
उत्तर : आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकायचे असे आदल्या दिवशी मनाशी ठरविले होते. मग, त्यात टाय झाला तरी आपण बाजी मारायची, हे अगदी मनाशी पक्के केले होते. कारण मी सरळ गुणावर हरले असते तर काही वाटले नसते; पण टाय झाल्यानंतर आपण कमी पडायचे नाही, हे मनावर कोरून ठेवले होते. त्यामुळेच मला सुवर्णपदक जिंकता आले.

प्रश्न : अचूक लक्ष्य भेदण्यासाठी मनाची एकाग्रता किती महत्त्वाची आहे ?
उत्तर : नेमबाजीच्या नियमित १० ते १२ तासांच्या सरावाबरोबरच मी असंख्य कथा, कादंबऱ्या वाचते. हे माझ्या यशामागचे गमक आहे. जाकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत माझ्या खेळप्रकाराआधी मी कन्नड लेखक एस. एल. भैरव यांच्या मराठीतील अनुवाद केलेल्या मंद्रू, तंतू या अनुक्रमे ५५० व १००० पानांच्या कादंबºया वाचल्या होत्या. वाचनामुळे मनाची एकाग्रता निर्माण होते. दीर्घकथा, कादंबºया या खेळाबरोबरच माझ्या सोबतीही राहिल्या आहेत.

प्रश्न : खेळ आणि नोकरी असे सांभाळताना कसरत करावी लागते का ?
उत्तर : नाही; कारण मी आज जी कुणी आहे, ती केवळ नेमबाजी या खेळामुळे आहे. त्यामुळे प्रथम प्राधान्य माझ्या खेळाला देते. विशेष म्हणजे महसूलमधील माझे वरिष्ठ अधिकारीही मी कार्यालयात गेले की विचारतात, आज काय सराव नाही का? यासह अनेक अधिकाºयांनी ‘राज्याला अनेक उपजिल्हाधिकारी मिळतील; पण राज्याला आणि देशाला पदक मिळवून देणारी नेमबाज राही आम्हाला हवी आहे. त्यामुळे त्याकडे अधिक लक्ष दे;’ असे सांगितले आहे. त्यामुळे प्रथम प्राधान्य माझ्या खेळालाच देते.

प्रश्न : कोल्हापुरातही तुझ्यासारख्या अनेक राही निर्माण व्हाव्यात, याकरिता तुझे काय प्रयत्न सुरू आहेत ?
उत्तर : २०१२ पासून मी विभागीय क्रीडासंकुलात पुण्यातील बालेवाडीसारखी आंतरराष्ट्रीय दर्जाची शूटिंग रेंज व्हावी, याकरिता आग्रही आहे. आता कुठे ही रेंज दृष्टिक्षेपात येऊ लागली आहे. विशेष म्हणजे स्विस कंपनीचे साहित्य मागविले जाणार होते. मात्र, विक्रीपश्चात सेवा मिळणार नाही; त्यामुळे ही यंत्रणा एकदा बंद पडली की पुन्हा अडचणी निर्माण व्हायला नकोत. याकरिता मी, तेजस्विनी सावंत, अन्य समिती सदस्यांनी जर्मन बनावटीचे साहित्य खरेदी करावे; त्याची विक्रीपश्चात सेवाही तत्काळ मिळेल याकरिता सूचना केली होती. त्यानुसार आता हे साहित्य भारतात पोहोचले आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या नेमबाजांसाठी येत्या काही दिवसांत कोल्हापुरातही आंतरराष्ट्रीय दर्जाची सोय निर्माण होईल. येथे शूटिंग रेंज नसल्यानेच मीही पुणे, मुंबई, दिल्लीसारख्या शूटिंग रेंजकडे वळले होते. येत्या काळात आणखी नेमबाज या कोल्हापूरच्या खाणीतून बाहेर पडतील आणि माझ्यासारखी नव्हे, तर माझ्याहीपेक्षा सरस कामगिरी करतील.

प्रश्न : नेमबाजीत काय आवश्यक आहे ?
उत्तर : मी दुधाळी शूटिंग रेंजवर सराव करीत होते. या ठिकाणी प्राथमिक बाबींची सुविधाही उपलब्ध नाही. माझ्या आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेती जर्मन प्रशिक्षक मुनिक बयान हिनेही कोल्हापुरात माझ्या घरी आल्यानंतर दुधाळीतील रेंजला भेट दिली होती. त्यानंतर तिची जी प्रतिक्रीया होती, ती सर्वांनी ऐकण्यासारखी होती; कारण या रेंजवर काहीच सुविधा नसताना तुम्ही खेळाडू कसे घडता असेही तिने विचारले. त्यावर मीही तिला आम्ही जिद्द आणि चिकाटी एवढेच आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. त्यामुळे सरावातील सातत्य, चिकाटी, संयम या बाबी नेमबाजीत आवश्यक आहेत.

प्रश्न : तुझ्या यशात कोणाचा वाटा आहे ?
उत्तर : माझ्या यशात आई, वडील, काका, काकी, भाऊ यांच्यासह स्थानिक प्रशिक्षक, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि समस्त कोल्हापूरकरांचा वाटा आहे; कारण माझ्या पडत्या काळात याच लोकांनी बळ दिले; त्यामुळे मी इतकी चांगली कामगिरी केली आणि याच बळावर आणखी चमकदार कामगिरी करीन.

Web Title: World champion Rahi Sarnobat, a medalist-medalist, needed to score an accurate goal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.