जागतिक चिमणी दिवस : शहरी भागातच चिमण्यांचा चिवचिवाट कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 06:18 PM2020-03-20T18:18:07+5:302020-03-20T18:19:49+5:30
चिमण्यांची चिवचिव कानी पडल्याशिवाय खेड्यातीलच नव्हे तर शहरातील सकाळही कधी उजाडलेली नाही. मात्र चिमण्यांचा चिवचिवाट शहरात कमी ऐकू येऊ लागला असला तरी ग्रामीण भागात चिमण्यांची संख्या कमी स्थिरच आहे, असे मत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सहायक संचालक डॉ. गिरिश जठार यांनी व्यक्त केले आहे.
संदीप आडनाईक
कोल्हापूर : चिमण्यांची चिवचिव कानी पडल्याशिवाय खेड्यातीलच नव्हे तर शहरातील सकाळही कधी उजाडलेली नाही. मात्र चिमण्यांचा चिवचिवाट शहरात कमी ऐकू येऊ लागला असला तरी ग्रामीण भागात चिमण्यांची संख्या कमी स्थिरच आहे, असे मत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सहायक संचालक डॉ. गिरिश जठार यांनी व्यक्त केले आहे.
शहरातील चिमण्यांची संख्या कमी झाली असली तरी गेल्या २५ वर्षात नोंदवलेल्या निरिक्षणांनुसार त्यांनी फक्त आपला अधिवास बदललेला आहे. अन्न न मिळणे, वाढते प्रदूषण यांबरोबरच शेतात पिकांसाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी रासायनिक खते आणि कीटकनाशके यांच्यामुळे चिमण्या मोठ्या संख्येने कमी होत आहेत, हे जरी खरे असले तरी तुलनेने ग्रामीण भागात चिमण्यांनी आपले वास्तव्य सोडलेले नाही.
‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून २० मार्च हा दिवस ओळखला जातो. ‘स्टेट आॅफ इंडियाज बर्ड २०२०’ या अहवालात चिमण्या वाढल्याची नोंद असली तरी ती शहरी भागात चिमण्या कमी झाल्याचे निरिक्षण देशभरातील सुमारे १५,५00 पक्षी निरिक्षकांनी नोंदविले आहे. नेहमीचा अधिवास सोडून चिमण्यांनी सुरक्षित आणि अन्न मिळेल अशा ठिकाणी आपला मुक्काम हलविला आहे, असे या निरिक्षणावरुन म्हणता येते.
शहरातअन्न मिळत नसल्याने ग्रामीण भागात चिमण्यांनी आपला मोर्चा वळविला आहे. असे असले तरी उसाच्या एकपीक पद्धतीमुळे ज्वारी, वरी, बाजरी, कुटकी, गहू यांसारखी पिके कमी नामशेष होत आहेत. त्यामुळे चिमण्यांना अन्न मिळत नाही.
पेरू, जांभूळ, अळू, तोरणे, धामणी, आसुळी, चिकुणी, निळुंबी, म्हेके, नेर्ली, करवंदे, बोर, चिंचा यांशिवाय बांधावरील चिवे, बांबू, बाभूळ, धावडा, भरुळा यांसारखी प्रादेशिक जंगली फळांची झाडे चिमण्यांच्या अन्नाचा नैसर्गिक स्रोत आहे. तो वाढविला पाहिजे.
वाढत्या शहरीकरणामुळेही चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. सिमेंटच्या घरबांधणीमुळे घरट्यांना जागाच उरलेली नाही. मात्र त्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागात वळवला आहे. चिमण्यांची संख्या स्थिर आहे, ती कमी निश्चितच झालेली नाही.
- डॉ. गिरिश जठार
सहाय्यक संचालक, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई