कोल्हापूर: वारणानगरमध्ये उभारले जागतिक दर्जाचे तारांगण, लवकरच सर्वांसाठी खुलं होणार
By समीर देशपांडे | Published: July 9, 2022 07:10 PM2022-07-09T19:10:05+5:302022-07-09T19:10:43+5:30
जर्मनच्या कार्ल झाईज कंपनीच्या या प्रकल्पासाठी वारणा संस्था समूहाने साडेचार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मुंबई, बंगळुरूनंतरचे जागतिक दर्जाचे तारांगण उभारण्यात आले आहे.
समीर देशपांडे
कोल्हापूर : सहकाराच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांतिकारी बदल घडवणाऱ्या वारणानगरमध्ये आता विज्ञानाची गुढी उभारली आहे. शालेय वयापासून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणीव निर्माण करण्यासाठी सायन्स ॲण्ड इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटरच्या पाठोपाठ आता मुंबई, बंगळुरूनंतरचे जागतिक दर्जाचे तारांगण उभारण्यात आले आहे. लवकरच हे तारांगण सर्वांसाठी खुले केले जाणार आहे.
जर्मनच्या कार्ल झाईज कंपनीच्या या प्रकल्पासाठी वारणा संस्था समूहाने साडेचार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अमेरिकन कंपनीचा डूम, जर्मनीचे प्रोजेक्टर आणि कोलकात्याच्या कंपनीकडून संचलन असलेल्या वातानुकूलित दालनातून आपण अवकाश दर्शन करू शकतो. ग्रहांचे संक्रमण, ब्रह्मांड, आकाशगंगा, तारे, तारकासमूह, कालक्रमानुसार पृथ्वीचा झालेला प्रवास, वातावरणातील बदल, चंद्र, सूर्याबद्दल शास्त्रीय माहिती उच्च दर्जाच्या व्हिडिओद्वारे पाहता येणार आहे. आपल्या डोक्यावर असणारे हे तारांगण किती अनंत, प्रचंड आणि निसर्गाची ताकद दाखवणारे आहे. याचेच प्रत्यंतर येथे येते.
महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी सायन्स ॲण्ड टेक्नाॅलाॅजी कमिशनच्या माध्यमातून प्रसिद्ध अणू शास्त्रज्ञ डाॅ. अनिल काकोडकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हे सेंटर उभारण्यात आले आहे. सर्व शास्त्रे, गणित, इलेक्ट्राॅनिक्समधील मूलभूत तत्त्वे सोप्या पद्धतीने सांगणारे प्रयोग या ठिकाणी विद्यार्थी करू शकतात. सांकेतिक भाषेतून संदेश निर्गमित करण्याच्या पद्धतीसारख्या वैज्ञानिक संकल्पनांची ओळख होते. २४ फेब्रुवारी २०१७ ला सुरू करण्यात आलेल्या या सेंटरचा आतापर्यंत राज्यभरातील ४० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. जगभरातील आणि भारतातील विज्ञान नोबेल विजेत्यांची ओळखही या ठिकाणी होते. पाण्याचा भोवरा कसा तयार होतो इथपासून कार्टून कशी तयार केली जातात इथपर्यंतची माहिती इथे मिळते.
दूरदृष्टीचे तात्यासाहेब कोरे ...
तात्यासाहेब कोरे यांनी दूरदृष्टी, अथक परिश्रम आणि सामान्यांविषयीच्या कळवळ्यातून वारणानगरचे सहकार शिल्प उभारले. आमदार विनय कोरे यांनी ते सर्व स्पर्शी करण्याचा निर्णय घेतला. याचाच एक भाग म्हणून गेल्या पाच वर्षात या ठिकाणी विज्ञानाचा जागर सुरू आहे. प्रशासकीय अधिकारी वासंती रासम यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य समन्वयक फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. जॉन डिसोझा हे या प्रकल्पांची जबाबदारी सांभाळत आहेत. प्रीतेश लोले, पोपट कुंभार, ऐश्वर्या मिठारी, किमया पोवार हे वैज्ञानिक अधिकारी म्हणून येथे काम करतात.
वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या माध्यमातून शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील २७ हजार ५०० विद्यार्थ्यांना येथे आणून वैज्ञानिक प्रयोग करून घेतले जातील. तारांगणासह सर्व सहकारी संस्था दाखविल्या जातील. वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा हेच आमचे उद्दिष्ट आहे. - आमदार विनय कोरे-अध्यक्ष, वारणा संस्था समूह