जागतिक पर्यावरण दिन विशेष : मला वाचवा...पंचगंगेची आर्त हाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 11:35 AM2018-06-05T11:35:51+5:302018-06-05T11:35:51+5:30
जागतिक पर्यावरण दिन आज, मंगळवारी सर्वत्र साजरा होत असता कोल्हापूरची जीवनदायिनी पंचगंगा नदी आता प्रदूषणाबरोबरच कचऱ्याच्या विळख्यात अडकली आहे. नदीच्या स्वच्छतेकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नदीचे आरोग्य बिघडत असून नागरिकांच्या आरोग्याबरोबरच निसर्गसाखळीतील महत्त्वाचा दुवा असणारे जलचर प्राणी मृत्युमुखी पडत आहेत.
विजय दळवी
कोल्हापूर : जागतिक पर्यावरण दिन आज, मंगळवारी सर्वत्र साजरा होत असता कोल्हापूरची जीवनदायिनी पंचगंगा नदी आता प्रदूषणाबरोबरच कचऱ्याच्या विळख्यात अडकली आहे.
नदीच्या स्वच्छतेकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नदीचे आरोग्य बिघडत असून नागरिकांच्या आरोग्याबरोबरच निसर्गसाखळीतील महत्त्वाचा दुवा असणारे जलचर प्राणी मृत्युमुखी पडत आहेत.
पंचगंगा नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याचबरोबर वाहून येणाऱ्या कचऱ्याचाही विळखा नदीसभोवती पडला आहे. अशावेळी आपल्या जीवनदायिनीच्या स्वच्छतेबाबत व शुद्धतेबाबत सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे.
लोकप्रतिनिधींनी जरी स्वच्छता व सुशोभीकरणाच्या घोषणा केल्या असल्या तरी त्या अमलात येण्यासाठी कालावधी लागेल. सध्या नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे नदीतील सगळा गाळ व कचरा काठावर आला आहे. त्याची उचल करून साफसफाई त्वरित करणे गरजेचे आहे.
अमर्याद घनकचरा, प्लास्टिक, जनावरे व कपडे धुणाऱ्यांची वाढती संख्या, आदींमुळे पंचगंगा नदीपात्र असह्य दुर्गंधीने ग्रासले आहे. गाळातील काचा व इतर घातक वस्तू पोहणाºयांना इजा पोहोचवत आहेत. त्यामुळे नियमित पोहणाऱ्यांची संख्याही रोडावली आहे.
अनेकांना पोहल्यानंतर अंगाला खाज सुटणे, डोळे लाल होणे, दात आंबणे आदींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे यंदाच्या मे महिन्याच्या सुटीत अनेक नवशिक्या जलतरणपटूंना नदीत डुंबण्याचा आनंद लुटता आला नाही.
कचरा सफाई करावी
मुलांना पोहण्यासाठी नेल्यावर नदीतील गाळात पाय अडकणे, पायात काचा घुसून लहान मुलांना इजा होत आहेत. त्यामुळे नदीकाठावरील गाळ व कचरा प्रशासनाने त्वरित हटवावा.
- रवी चिले (मेस्त्री)
पर्यटकांतून चुकीचा संदेश
राज्यासह परराज्यांतील पर्यटक विसावा आणि स्नानाकरिता पंचगंगेवर येत असतात. मात्र, त्यांनाही नदीच्या पाण्यातील दुर्गंधीला सामोरे जावे लागते. अनेकांनी अंगाला खाज सुटल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे एकूणच कोल्हापूर व पंचगंगा नदीकाठ अस्वच्छ असल्याचा संदेश राज्यभर जात आहे.
अधिक महिन्यानिमित्त भाविकांची स्नानासाठी गर्दी होत आहे. मात्र, पाण्याची परिस्थिती पाहिल्यानंतर अनेकजण स्नानाविनाच परतत आहेत. याबाबत अनेकांनी उघडपणे जिल्हा प्रशासन, महापालिका व आरोग्य खाते यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली.