कोल्हापूरकर रमले फुलांच्या दुनियेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:49 AM2017-12-25T00:49:38+5:302017-12-25T00:50:06+5:30
कोल्हापूर : मनाला प्रसन्न करणारी लाखो रंगीबेरंगी फुले, फुलांपासून केलेल्या आकर्षक रचना, छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या पुतळ्यांना केलेली मनमोहक पुष्परचना आणि जिथे तिथे सेल्फी घेणारे हजारो नागरिक असे जल्लोषी वातावरण कोल्हापूरच्या पोलीस उद्यानामध्ये रविवारी अनुभवण्यास मिळाले. निमित्त होते कोल्हापुरात आयोजित ‘फ्लॉवर फेस्टिव्हल’चे.
कोल्हापूर रस्ते विकास प्रकल्प (केएसबीपी)यांच्यावतीने महाराष्ट्रातील पहिला ‘फ्लॉवर फेस्टिव्हल’ येथील पोलीस उद्यानामध्ये आयोजित करण्यात आला असून कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते रविवारी या फेस्टिव्हलचे उद्घाटन करण्यात आले.
‘केएसबीपी’चे संचालक सुजय पित्रे म्हणाले, भारतातील निवडक ठिकाणी होणाºया फ्लॉवर फेस्टिव्हलमध्ये आता कोल्हापूरची भर पडली असून, इथल्या शेतकºयांना फूलशेतीला प्रोत्साहन देण्यासाठीही हा फेस्टिव्हल उपयुक्त ठरेल.
यावेळी व्यासपीठावर अंजली पाटील, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू तेजस्विनी सावंत, समीर दरेकर, संदीप देसाई उपस्थित होते. कार्यक्रमाला निवास साळोखे, अनुराधा भोसले, किशोर देशपांडे, अनंत खासबारदार, शिरीष खांडेकर, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, सिद्धार्थ लाटकर, सचिन शानबाग उपस्थित होते.
फेबु्रवारीमध्ये कोल्हापुरात कलामहोत्सव
आपल्या आगामी उपक्रमांची घोषणा करताना मंत्री पाटील म्हणाले, ९, १० व ११ फेब्रुवारी २०१८ रोजी कोल्हापूरमध्ये भव्य कलामहोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये दिग्गज कलाकार सहभागी होणार असून, रोज ५० हजार नागरिक याचा लाभ घेऊ शकतील. शिवाजी स्टेडियमवर हा महोत्सव होणार आहे. तसेच एप्रिल-मे महिन्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्लक्षित पर्यटन ठिकाणे दाखविण्यासाठी कोल्हापूर दर्शन सहली आयोजित करण्यात येणार आहेत.
आता शहरातील युवकांसाठी योजना
गेल्या तीन वर्षांमध्ये शासनाने ग्रामीण भागातील शेतकºयांसाठी विविध योजना जाहीर केल्या. यापुढच्या काळात आता शहरातील युवक-युवतींसाठी विविध योजना सरकार सुरू करणार असून, त्यातून आपल्या कमाईचे समाधान त्यांना मिळविता येईल. आताच एक कर्ज योजनाही जाहीर करण्यात आल्याचे यावेळी मंत्री पाटील यांनी सांगितले.
सेल्फी, फोटोसाठी प्रचंड गर्दी
संयोजकांनी या ठिकाणी सेल्फी पार्इंट विकसित केल्याने सेल्फी घेण्यासाठी नागरिकांनी, युवक-युवतींनी मोठी गर्दी केली होती. राधानगरी धरणाची प्रतिकृती, आईस कार्व्हिंग, स्वातंत्र्यसमराची माहिती देणारे फलक, मेक इन इंडियाची प्रतिकृती, विमानाची पुष्प प्रतिकृती या ठिकाणी नागरिकांनी फोटोसाठी मोठी गर्दी केली होती. पहिल्याच दिवशी नागरिकांनी फेस्टिव्हलमध्ये उत्स्फूर्त हजेरी लावली.
नितीन देसार्इंनी पाठविल्या मूर्ती
फेस्टिव्हल, मिरवणुकीमध्ये सादर केलेल्या सर्व मूर्ती, साहित्य कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी सुमारे १५ ट्रकमधून पाठविले आहे. मूर्तींमुळे फेस्टिव्हलला भव्यता आली.