संसार चिखलातच...!
By admin | Published: November 17, 2014 12:10 AM2014-11-17T00:10:40+5:302014-11-17T00:24:08+5:30
गळीत हंगामावर अवकळा : ऊसतोड मजुरांना सतावतोय निवाऱ्याचा प्रश्न
गणपती कोळी - कुरुंदवाड -निर्जन ठिकाणी वास्तव्य, गैरसोयींच्या व झाडाझुडपांनी व्यापलेले, कधी रणरणत्या उन्हात होरपळून निघायचे, तर कधी वादळी वाऱ्यातून खोपट उडून जायचे, तर पावसात गुडघाभर चिखलातून संसार थाटायचा याचे सुख-दु:ख कोणालाच नाही. ही अवस्था आहे ऊसतोड मजुरांची. दोन दिवस पडलेल्या पावसामुळे खोपटात पाणी शिरले आणि चिखल झाला. खोपटातील कर्ती माणसं कंत्राटदारांचे पैसे फेडण्यासाठी ऊस तोडण्यासाठी शेतावर गेली आहेत अन् त्यांची लहान मुले खोपटातील पाणी काढून पूर्ववत संसार थाटत आहेत. या मजुरांच्या जिवावर वाहतूकदार, कंत्राटदार मोठे झाले. मात्र, मानवतेतून या मजुरांच्या किमान निवाऱ्याचा प्रश्न तरी सुटायला हवा.
ऊसतोड हंगाम चालू झाला की, सोलापूर, लातूर, बीड, उस्मानाबाद, कर्नाटक, आदी भागांतून मजुरांचा तांडा येतो. या भागातील बहुतेक मजुरांचे शेती क्षेत्र मोठे आहे. मात्र, पाण्याअभावी शेती पिकत नाही. त्यामुळे पोटाची भूक व संसाराचा गाडा चालविण्यासाठी ऊसतोड मजुरीचा पर्याय स्वीकारावा लागतो. त्यासाठी ऊस वाहतूकदारांकडून उचल घेतली जाते व ते मजुरी करून फेडतात.
मजुरांच्या अस्वच्छतेचे कारण पुढे करीत सधन भागातील लोक गावालगत अथवा आपल्या शेतात तांडा उभारण्यास तयार नसल्याने निर्जन, पडीक जमीन असलेल्या ठिकाणी हा तांडा विसावतो. पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या या मजुरांची गैरसोयींबाबत अजिबात तक्रार नसते. हंगामातील ऊन, वारा, पाऊस, थंडी याबरोबरच सरपटणाऱ्या प्राण्यांशी दोन हात करीत त्यांना प्रत्येक दिवस घालवावा लागतो.
दोन दिवसांच्या पावसाच्या रिपरिपीमुळे खोपटाभोवती पाणी साचले आहे. अनेकांच्या खोपटांतच पाणी शिरले आहे. कंत्राटदार, वाहतूकदार अथवा साखर कारखानदार यांचा मजुरांना दिलेले पैसे फेडून घेणे एवढाच उद्देश असल्याने, अशा संकटावेळीही खोपटावर थांबून चालत नाही. त्यामुळे या कामाची जबाबदारी लहान मुलांवर टाकून ते ऊसतोडीसाठी जात आहेत. पावसामुळे ऊसतोड मजुरांचे हाल पाहून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाचे मन हेलावते. मात्र, मजुरांची परवड थांबता थांबत नाही. याबाबत गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.
कामागरांकडून काम करून घेताना त्यांना मूलभूत सुविधा देणे हेही तितकेच बंधनकारक आहे. साखर कारखानदार व वाहतूकदार यांच्या समन्वयाने किमान त्यांच्या निवाऱ्याची सोय करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांच्या मजुरीतून काही रक्कम कपात करून सोयी दिल्या, तरी त्याला कोणाचा विरोध राहणार नाही. मात्र, हे मजूर आगाऊ घेतलेली उचल फेडण्यासाठी आले आहेत. ते कोणत्या परिस्थितीत राहतात याचे काही देणेघेणे नाही, असा समज करणे म्हणजे एक प्रकारे या मजुरांच्या जिवाशीच खेळण्याचा प्रकार आहे. त्यामुळे जागरूक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांनी कारखानदारांना जागे करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
कुरुंदवाड-शिरढोण रस्त्यालगत अवकाळी पावसामुळे ऊसतोड मजुरांच्या खोपटाभोवती साचलेले पाणी व चिखल यातच हंगामी संसार थाटावा लागत आहे.