World organ donation day: मृत्यूचा उत्सव साजरा करण्यातही कोल्हापूरकरांचा पुढाकार

By संदीप आडनाईक | Published: August 13, 2024 01:51 PM2024-08-13T13:51:26+5:302024-08-13T13:51:48+5:30

कोल्हापूरची जनजागृतीचे केंद्र बनण्याकडे वाटचाल

World Organ Donation Day: Kolhapur city is moving towards becoming a center for organ donation awareness | World organ donation day: मृत्यूचा उत्सव साजरा करण्यातही कोल्हापूरकरांचा पुढाकार

World organ donation day: मृत्यूचा उत्सव साजरा करण्यातही कोल्हापूरकरांचा पुढाकार

संदीप आडनाईक

कोल्हापूर : प्रत्येक गोष्टीत उत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेणारा कोल्हापूरकर मृत्यूचा उत्सव साजरा करण्यातही आघाडीवर आहे. अवयवदान करण्याचे प्रमाण जगभरातच कमी आहे. असे असतानाही कोल्हापुरातूनही मृत्यूनंतर अवयवदान करण्यासाठी काही युवक पुढाकार घेत आहेत.

अवयवदान हा अनेक रुग्णांसाठी एकमेव आशेचा किरण आहे. याची जाणीव झाल्यामुळे कोल्हापूरकरांनीही गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या रुग्णालयामार्फत अवयवदान करून रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. जिल्ह्यातील पहिले अवयवदान निगवे खालसा गावातून झालेले आहे. शिवाय त्वचादान, नेत्रदान, हृदयप्रत्यारोपणातही कोल्हापूर पहिले आहे. हे शहर अवयवदान जनजागृतीचे केंद्र बनण्याकडे वाटचाल करत आहे.

पहिले अवयवदान जिल्ह्यातून

निगवे खालसा येथील अमर पाटील यांनीही जिल्ह्यातील पहिले अवयवदान केले आहे. कोल्हापुरातील प्रा. प्रशांत कुचेकर यांचे हृदयप्रत्यारोपण मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये सर्वात प्रथम झाले. ते अवयवदान या विषयावर पीएच.डी. करत आहेत. मुरगूड येथील स्वप्नील रणवरे यांनी डिसेंबर २०००मध्ये हृदयप्रत्यारोपण केले आहे. कोल्हापुरातील मंदाकिनी सुरेश भूमकर यांनीही पहिले त्वचादान केले आहे.

याशिवाय देवाळे, ता. करवीर येथील एका दात्याने एप्रिल २०२२ मध्ये एक यकृत, एक किडनी आणि एक हृदय दान केले. त्याचे यकृताचे प्रत्यारोपण आधार हॉस्पिटलमध्ये करण्यात आले. एका किडनीचा एक भाग आधारला, तर दुसरा पुना हॉस्पिटलला देण्यात आला. मे २०२२ मध्ये २४ वर्षीय तरुणाच्या अवयवदानामुळे ३८ वर्षीय भाजी विक्रेत्याला यकृत बसविले, तर चौघांना त्याचे डोळे, मूत्रपिंड, हृदय बसविल्यामुळे त्यांना जीवदान मिळाले.

कोल्हापूर बनत आहे जनजागृतीचे केंद्र

दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन मुंबईसोबत कोल्हापुरातील यशोदर्शन फाउंडेशनच्या मदतीने कोल्हापूर शहर अवयवदान जनजागृतीचे केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यातही ही संस्था कार्य करत आहे. फेडरेशन यावर्षी प्रशिक्षण वर्षानिमित्त जिल्ह्यात अवयवदान समन्वयकांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करत आहे. याशिवाय राज्यस्तरीय अधिवेशनही घेतले जाणार असल्याचे या संस्थेचे संस्थापक योगेश देवीचरण अग्रवाल यांनी सांगितले.

कोणते अवयवदान करता येऊ शकतात?

मूत्रपिंड, फुप्फूस, यकृत, स्वादूपिंड, हृदय, आतडी, डोळे, त्वचा, हृदयाची झडप आणि कानांचे डूम.

वर्षभरात किती दात्यांनी केले अवयव दान?
अवयव - दाते

हृदय - २
मूत्रपिंड -२
यकृत -२
फुप्फूस -०
नेत्र -४१

Web Title: World Organ Donation Day: Kolhapur city is moving towards becoming a center for organ donation awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.