सौंदत्ती यात्रेला मानाचे ‘जग’ रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:33 AM2017-11-27T00:33:14+5:302017-11-27T00:36:55+5:30
कोल्हापूर : ‘उदं गं आई उदं’चा गजर, भंडाºयाची उधळण करत फुलांनी सजलेले रेणुकादेवीचे मानाचे जग हलगीच्या कडकडाटात, मंगलमय, धार्मिक वातावरणात रविवारी सौंदत्ती यात्रेसाठी रवाना झाले. मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त सौंदत्ती (कर्नाटक) येथे शनिवारी (दि.२ डिसेंबर) रेणुकादेवीची यात्रा होत आहे. कोल्हापुरातून मानाचे चार जग दरवर्षी सौंदत्ती यात्रेला जातात. ओढ्यावरील यल्लम्मा मंदिर येथील मधुआई जाधव, रविवार पेठेतील संदीप पाटील, गंगावेशमधील केराआई, बेलबाग येथील शिवाजीराव आळवेकर हे या मानाच्या जगांचे मानकरी आहेत.
बेलबाग येथे शिवाजीराव आळवेकर यांच्या मानाच्या जगाची महापौर हसिना फरास यांच्या हस्ते व माजी उपमहापौर परीक्षित पन्हाळकर आणि माजी नगरसेवक आदिल फरास यांच्या उपस्थितीत आरती झाली. त्यानंतर दुपारी हा जग सौंदत्ती यात्रेसाठी रवाना झाला. त्यानंतर दुपारी विविध ठिकाणांहून फुलांनी सजलेले जग बिंदू चौकातील गजेंद्रलक्ष्मी मंदिरात एकत्र आले. येथेही जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष विजया डावरे आणि करवीरनिवासिनी रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष उदय पाटील यांच्या हस्ते आरती झाली. सौंदत्ती येथे २ डिसेंबर रोजी यात्रा असली तरी गुरूवारी (दि. ३०) भाविक एस.टी. बसेस व वाहनांतून रवाना होतात.
याप्रसंगी जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष विजया डावरे, माजी अध्यक्ष अच्युतराव साळोखे, गजानन विभूते, दीपक जाधव, अशोकराव जाधव, करवीर निवासिनी रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष उदय पाटील, प्रशांत खाडे, संजय मांगलेकर, बाबूराव पाटील, आदी उपस्थित होेते.
नियोजनासाठी आमदारांसोबत बैठक
या यात्रेच्या नियोजनासाठी आज, सोमवारी सकाळी ११ वाजता मध्यवर्ती बसस्थानकच्या हॉलमध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांनी बैठक आयोजित केली आहे. यासाठी दोन्हीही संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना, भक्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
भाविक गुरुवारी जाणार
कोल्हापुरातून गुरुवारी, दि. ३० नोव्हेंबर रोजी पहाटेपासून भाविक एस.टी.द्वारे यात्रेसाठी जाणार आहेत. घटप्रभा कॅनॉल येथे माजी आमदार मालोजीराजे यांच्यातर्फे भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. त्यानंतर जोगुळाभावी कुंड या ठिकाणी लिंब नेसण्याचा विधी होणार आहे. त्यानंतर भाविक सौंदत्ती डोंगर येथे दर्शनासाठी जाणार आहेत.ं