महापालिकेसाठी ‘महायुद्ध’
By admin | Published: September 29, 2015 12:01 AM2015-09-29T00:01:59+5:302015-09-29T00:10:33+5:30
आठवी पंचवार्षिक निवडणूक : भाजपची कसोटी तर दोन्ही काँग्रेससह शिवसेनेचा घरोबा शक्य
विश्वास पाटील -- कोल्हापूर महापालिकेची नोव्हेंबर २०१५ मध्ये होऊ घातलेली ही आठवी पंचवार्षिक निवडणूक आहे. ४० नगरसेवकांवरून सुरू झालेली नगरपालिका आता या निवडणुकीत ८१ नगरसेवकांना निवडून देणार आहे. अपक्षांना निवडून दिल्यावर पदाधिकारी निवडीत घोडेबाजार होतो, अशी टीका झाल्यानंतर गत निवडणुकीपासून पक्षीय पातळीवर ही निवडणूक होत आहे. या वेळेलाही ती तशीच होत असली, तरी केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपची खरी कसोटी असेल. सध्या या पक्षाचे अवघे दोन सदस्य आहेत व त्यांना ही संख्या ४१ वर नेण्याचे दिव्य आहे.राज्यात सत्ता आल्यानंतर सरकारला एक वर्ष पूर्ण होत असतानाच या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे लोकमानस भाजपच्या बाजूने आहे की ते बदलले आहे, याचाही फैसला या निवडणुकीमुळे होणार आहे. राज्यात व केंद्रात सत्तेत असलेले भाजप व शिवसेना हे दोन पक्ष कोल्हापूर महापालिकेतही स्वतंत्रपणे लढत आहेत. सत्तेनंतर या दोन पक्षांतील दरी चांगलीच रुंदावली आहे. त्यामुळे एकवेळ काँग्रेस-राष्ट्रवादी चालेल; परंतु या जुन्या मित्रांची संगत नको, अशी या दोन्ही पक्षांची मानसिकता दिसते आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर दोन्ही काँग्रेसला यश मिळाले तर त्यांची सत्ता व मदत लागली तर शिवसेनेलाही ते बरोबर घेऊन सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करतील.महापौरपदाची संधीआगामी महापौरपद ‘नागरिकांचा मागासवर्ग महिले’साठी आरक्षित आहे. एकूण ८१ पैकी अकरा प्रभाग त्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत. त्यामुळे या प्रभागातील लढतींना मोठे महत्त्व येणार आहे. हे अकरा प्रभाग सोडून ‘सर्वसाधारण प्रवर्गा’तून एखादी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील महिला निवडून आल्यास ती देखील महापौरपदाची दावेदार ठरू शकते, परंतु तशी संधी मिळण्याची शक्यता फारच धूसर असते. ‘नागरिकांचा मागासवर्ग महिलां’साठी आरक्षित झालेले प्रभाग असे : पोलीस लाईन, सर्किट हाऊस, बाजारगेट, महालक्ष्मी मंदिर, यादवनगर, राजारामपुरी-तवणाप्पा पाटणे हायस्कूल, सुभाषनगर, राजलक्ष्मीनगर, सानेगुरुजी वसाहत, मध्यवर्ती सभागृह आणि रायगड कॉलनी-बाबा जरगनगर.
एकही महापौर आमदार नाही...महापालिकेत आतापर्यंत ४२ महापौर व ३९ उपमहापौर झाले आहेत. यापैकी एकाही व्यक्तीस दुसऱ्यांदा महापौर होण्याची संधी मिळालेली नाहीच शिवाय एकही महापौर आतापर्यंत आमदारही झालेला नाही. महादेवराव आडगुळे, बाबूराव पारखे, दिनकर पाटील, रामभाऊ फाळके (लोकसभेला) आर. के. पोवार, प्रल्हाद चव्हाण यांनी विधानसभेला नशीब आजमावून पाहिले परंतु या शहराने त्यांना ती संधी दिली नाही.
विद्यमान सभागृहातील पक्षीय बलाबल पक्षसंख्याबळपैकी अपक्षांचा पाठिंबा
काँग्रेस३३०२
राष्ट्रवादी २६०१
शिवसेना-भाजप आघाडी०९०२
जनसुराज्य आघाडी०९०५
स्वीकृत ०५
काळा डाग
महापालिकेच्या तत्कालीन महापौर तृप्ती माळवी यांना ३० जानेवारी २०१५ ला महापौर दालनातच १६ हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. महापौरांनाच लाच घेतल्याच्या संशयावरून पकडण्यात आल्याची महापालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना. त्यामुळे या शहराची बेअब्रू झाली.
निवडणुकीवर दृिष्टक्षेप : आठवी पंचवार्षिक निवडणूक
एकूण प्रभाग : ८१ सर्वसाधारण प्रवर्गातील प्रभाग : एकूण ४८ (त्यांतील महिला २४)
नागरिकांचा इतर मागासवर्गीय - ओबीसी : एकूण २२ (त्यांतील महिला ११)
अनुसूचित जाती : एकूण ११ (त्यांतील सहा महिला)
निव्वळ महिलांसाठी आरक्षित प्रभागांची संख्या : ४१
शहराची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या : ५ लाख ४९ हजार २३६
शहराची मतदार संख्या : ४ लाख ७० हजार
एका प्रभागातील सरासरी लोकसंख्या : ६ हजार ७८०
एका प्रभागातील सरासरी मतदारसंख्या : ५६००
सरासरी बाराशे ते दीड हजार मतदानात लागणार गुलाल
गाड्या जमा..!---महापालिकेची निवडणूक राज्य आयोगाने सोमवारी दुपारी जाहीर केल्यानंतर लगेच आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे महापौरांसह सर्व आठ पदाधिकाऱ्यांच्या गाड्या प्रशासनाने रात्री सुभाष रोडवरील के.एम.टी. कार्यशाळेत जमा करून घेतल्या.
पानसरे स्वीकृत नगरसेवक
दिवंगत ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हे १९६७ ते १९७२ च्या सभागृहात ‘स्वीकृत नगरसेवक’ होते. त्यावेळी ‘स्वीकृत सदस्य’ म्हणून चांगल्या माणसांना संधी देण्याची प्रवृत्ती होती. त्यामुळे पानसरे यांच्यासोबतच दत्तात्रय कणेरकर, दत्तात्रय खराडे, हरिभाऊ प्रभावळकर, मालती भोसले यांना ‘स्वीकृत’ म्हणून काम करता आले.