जगातील सर्वश्रेष्ठ आजोबा -
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:50 AM2020-12-11T04:50:58+5:302020-12-11T04:50:58+5:30
ज्यांच्यामुळे आपण चांगले आणि सुसंस्कारी घडतो, ज्यांचे आदर्श नजरेसमोर ठेवून मार्गक्रमण करतो, ती व्यक्ती जवळची आणि लाडकी असेल ...
ज्यांच्यामुळे आपण चांगले आणि सुसंस्कारी घडतो, ज्यांचे आदर्श नजरेसमोर ठेवून मार्गक्रमण करतो, ती व्यक्ती जवळची आणि लाडकी असेल तर त्या व्यक्तीला हृदयात स्थान असते. त्यांनी दिलेले संस्कार, आपुलकी, माया, प्रेम याचे आचरण म्हणजेच त्यांची आठवण होय. आमचे संस्कार दातृत्व आजोबा डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांची आज ९९ वी जयंती, यानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा....
आजोबा म्हणजे आमचे मार्गदर्शक व गुरू होते. प्रत्येकाला त्यांच्या आवडत्या कामात ते प्रोत्साहन द्यायचे. त्यामुळे प्रत्येकाला ते आपले जिव्हाळ्याचे होते. आजोबा ज्यावेळी कामासाठी मुंबई, पुणे, दिल्लीला जात, तेव्हा बऱ्याच वेळा मी त्यांच्याबरोबर असे. त्यावेळी आपल्या संस्थेचे काम पूर्ण व्हावे म्हणून त्यांनी केलेली धडपड, धावपळ मी पाहिली आहे. यातूनच त्यांनी आपल्या संस्था उभारल्या व चांगल्या पद्धतीने चालविल्या. त्यांची काम पूर्ण करण्याची जिद्द आम्ही कधीही विसरणार नाही. म्हणूनच मला माझे आजोबा ‘जगातील सर्वश्रेष्ठ आजोबा’ वाटतात. अजूनही त्यांचे सुविचार प्रत्येक प्रसंगी मार्गदर्शक ठरतात.
त्यांच्या शिस्तीत आणि संस्कारात वाढलेले माझे वडील गणपतराव आप्पासाहेब पाटील यांनी आजोबांच्या कामाचा वसा आणि वारसा तसाच पुढे चालू ठेवला आहे. शेती आणि सहकार यांचा मेळ या दोघांनी चांगला साधला आहे. स्वत: केलेल्या कष्टामुळेच आजोबा आणि वडील एका अष्टपैलू हिऱ्यासारखे घडले. त्यांच्या खंबीर मनामुळे कुटुंबाला त्यांनी एकसंध ठेवलं. कधी डगमगू दिलं नाही. अशा आमच्या दातृत्वाचा कल्पवृक्ष असलेल्या आजोबांना शतक महोत्सवी प्रारंभ जयंती दिनी विनम्र अभिवादन.
- सौ. अस्मिता रमेश पाटील
फोटो - १०१२२०२०-जेएवाय-०३-स्व. सा. रे. पाटील