‘लक्ष्मी-कुबेर’चे पूजन उत्साहात
By admin | Published: October 31, 2016 12:05 AM2016-10-31T00:05:20+5:302016-10-31T00:05:20+5:30
आतषबाजीने उजळला आसमंत : अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी; आज पाडवा
कोल्हापूर : असंख्य दीप आणि रोषणाईचा झगमगाट, रांगोळीची सजावट, आंब्याची पाने, झेंडूच्या फुलांच्या माळा, कलशावर लक्ष्मीची, तसेच धनाचा अधिपती कुबेराच्या प्रतिमेची स्थापना, मंत्रोच्चार, आरती, धूप-दीप आणि सायंकाळच्या अमृतवेळी मांगल्य आणि भक्तिभावाच्या सुगंधी वातावरणात घराघरांत, कार्यालयांत, तसेच उद्योग-व्यवसायांच्या ठिकाणी वैभव, सुख, समृद्धी आणि भरभराटीचे दान देणाऱ्या लक्ष्मी-कुबेराची रविवारी पारंपरिक थाटात सर्वांनीच मनोभावे पूजा केली. दरम्यान, करवीरनिवासिनी अंबाबाईची धनलक्ष्मी रूपात पूजा बांधण्यात आली होती. देवीच्या दर्शनासाठी स्थानिक भक्तांसह परराज्यांतील भाविकांनीही रविवारी पहाटेपासून गर्दी केली होती.
लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त रविवारी सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटे ते रात्री आठ वाजून ४५ मिनिटे या वेळेत होता. लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या साहित्यखरेदीसाठी नागरिकांची दुपारपर्यंत बाजारपेठेत लगबग सुरू होती. लक्ष्मीच्या मनोभावे स्वागतकार्यात घराघरांतील सुवासिनी महिला दुपारी चार वाजल्यापासून व्यस्त होत्या. लक्ष्मीच्या स्वागतासाठी त्यांनी आपल्या दारांत मोठमोठ्या, विविधरंगी रांगोळ्या काढल्या. सायंकाळी सहाच्या सुमारास घराघरांमध्ये लक्ष्मीपूजनाची धांदल उडाली. घरात चौरंगावर लक्ष्मी-कुबेराची प्रतिमा, समोर कलश मांडण्यात आला. धान्याच्या राशीवर लक्ष्मीची मूर्ती, तर चौरंगावर शेजारी एका बाजूला सुपारीरूपी गणपती, दुसऱ्या बाजूला सरस्वतीचे प्रतीक असलेली लेखणी पूजनासाठी ठेवली होती. यावेळी अनेकांनी मेसेज, व्हॉट्स अॅप, फेसबुकच्या माध्यमातून लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा दिल्या.
व्यापारी, सराफ पेढ्यांवर उत्साहाने पूजा
कार्यालये, व्यावसायिक, दुकानदारांनीही सायंकाळी व रात्री लक्ष्मीपूजन केले. सोने-चांदीचा व्यवसाय करणाऱ्या सराफांच्या पेढ्यांवर अधिक धार्मिक विधींनी ही पूजा करण्यात आली. झेंडूच्या फुलांच्या माळा, विद्युतमाळा, पणत्या लावून दुकाने सजविण्यात आली होती. काही दुकानांमध्ये एका बाजूला लक्ष्मीपूजन आणि दुसऱ्या बाजूला ग्राहकसेवा असे चित्र होते. दुकानांमध्ये वर्षातून एकदा होणाऱ्या या खास पूजनाला सर्व कुटुंबीयांनी उपस्थिती लावली होती.
आज पाडवा
पाडव्याच्या खरेदीसाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. ग्राहकांची अधिकाधिक गर्दी खेचण्यासाठी विविध वस्तूंच्या खरेदीवर सवलत आणि बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. सोन्या-चांदीसह, चारचाकी, दुचाकी वाहनखरेदीकडे कल असतो. महाद्वार रोड, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी असा व्यापारी भाग पाडव्यासाठी सज्ज झाला आहे. वहीपूजन झाल्यानंतर फटाक्यांच्या आतषबाजीत पाडवा साजरा करण्याची परंपरा आहे.