Navratri 2024: ललिता पंचमीला अंबाबाई देवीची हत्तीवरील पूजा, अंबाबाई-त्र्यंबोलीची झाली भेट
By इंदुमती सूर्यवंशी | Published: October 8, 2024 05:48 PM2024-10-08T17:48:26+5:302024-10-08T17:49:26+5:30
कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवात ललिता पंचमीनिमित्त मंगळवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची अंबारीतील शाही पूजा बांधण्यात आली. या अंबारीत बसून ...
कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवात ललिता पंचमीनिमित्त मंगळवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची अंबारीतील शाही पूजा बांधण्यात आली. या अंबारीत बसून अंबाबाई आपली प्रिय सखी त्र्यंबोली देवीच्या भेटीला निघाला असा या पूजेचा अर्थ आहे.
कोल्हासूर वध करताना आई अंबाबाईने कोल्हासुराला वरदान दिले होते की या नगरीला तुझे नाव दिले जाईल. पुढे कोल्हासूराचा नातू कामाक्ष याने कपिलमुनींकडून योगदंड मिळवून अंबाबाईसह सर्व देवतांचे रूपांतर बकऱ्यामध्ये केले. त्यातून फक्त त्र्यंबोली देवी वाचली होती. ही गोष्ट कळताच त्र्यंबोली देवीने चतुराईने कामाक्ष दैत्याकडून योगदंड काढून घेतला आणि त्याचेच रूपांतर बकऱ्यांमध्ये केले व अंबाबाईसह सर्व देवांची मुक्तता केली.
अंबाबाईच्या विजयोत्सवात देव त्र्यंबोलीला बोलवायचे विसरले त्यामुळे त्र्यंबोली रागाने शहराबाहेरच्या टेकडीवर येऊन अंबाबाईकडे पाठ करून बसली, ही चुक लक्षात येताच अंबाबाई स्वत: देवांसह तिच्या भेटीला आली आणि तिने तिला वरदान दिले की आज पासून तू या क्षेत्राची संरक्षक देवता आहेस जो कोणी व्यक्ती तुला सांगितल्या वाचून पुण्य कर्म करेल तर त्याचे पुण्यफल घेण्याचा अधिकार तुझा असेल. याखेरीज जो कुष्मांडभेदनाचा सोहळा माझ्या मुक्ती मंडपात होतो तो यापुढे तुझ्यासमोर होईल मी दरवर्षी तुझ्या भेटीला येईन. त्यामुळे ललिता पंचमीला करवीर निवासिनी अंबाबाई त्र्यंबोली भेटीसाठी जाते. या कथेला अनुसरून ललिता पंचमीला पूजा बांधली जाते.