Navratri2022: सहाव्या माळेला अंबाबाईची 'भुक्तिमुक्तिप्रदायिनी देवीच्या' रूपात सालंकृत पूजा
By इंदुमती सूर्यवंशी | Published: October 1, 2022 05:18 PM2022-10-01T17:18:52+5:302022-10-01T17:23:37+5:30
गेल्या पाच दिवसातील ४ लाखांवरील उच्चांकी गर्दी करत भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले.
कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या सहाव्या माळेला आज, शनिवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची भुक्तिमुक्तिप्रदायिनी देवीच्या रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. गेल्या पाच दिवसातील ४ लाखांवरील उच्चांकी गर्दी करत भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. शनिवारच्या सुट्टीचा दिवस साधत राज्यच नव्हे तर देशभरातून आलेल्या भाविकांमुळे फक्त अंबाबाई मंदिर परिसरच नव्हे तर अवघ्या कोल्हापुरात जणू यात्रा भरली होती.
भूतलवर असलेल्या करवीर म्हणजेच कोल्हापूर या अतिपावन तीर्थक्षेत्रात देव, मुनी, गंधर्व, सिद्ध, यक्ष, चारण, किन्नर यांचा वास आहे. हे जगतजननी अंबाबाईचे आद्यपीठ असून येथे भुक्ती आणि मुक्ती प्राप्त होते. सिद्धी, बुद्धी भोग आणि मोक्ष करणारी अंबाबाई येथे आहे. श्री दुर्गासप्तशतीच्या १२ अध्यायानुसार सुरथ राजा आणि समाधी वैश्य यांनी नदीच्या किनाऱ्यावर निराहारी राहून तीन वर्षे तपश्चर्या केल्यावर अंबाबाई त्यांच्यावर प्रसन्न झाली. तिने दोघांना वर मागण्यास सांगितले, त्यावर सुरथ राजाने आपले गेलेले राज्य व वैभव परत मिळावे असा वर मागितला. तर समाधीने आसक्तीचा नाश करणारे ज्ञान मागितले. देवीने दोघांनाही इच्छित वर दिले व गुप्त झाली. याप्रमाणे शनिवारची पूजा राजवैश्यवरप्रदान म्हणजेच भुक्तिमुक्तिप्रदायिनी देवी या रुपात होती. ही पूजा गजानन मुनीश्वर, मुकूल मुनीश्वर, श्रीनिवास जोशी यांनी बांधली.
दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
गेल्या पाच दिवसांपैकी शुक्रवारी सव्वा तीन लाख भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले होते. शनिवारी त्याहून अधिक गर्दी मंदिर परिसरात होती. पहाटे चार वाजल्यापासून मुख्य दर्शन रांगा भरल्या होत्या. शनिवार रविवार सलग सुट्ट्या असल्याने परगावची चार चाकी वाहने आणि बसेस कोल्हापुरात दाखल झाले होते. त्यामुळे सगळीकडे वाहतुकीची कोंडी झाली. फक्त मंदिर परिसरच नव्हे तर अख्ख्या कोल्हापुरात जत्रा भरली की काय अशी स्थिती होती.