Navratri2022: सिद्धीदात्री देवीच्या रूपात अंबाबाईची पूजा -video
By इंदुमती सूर्यवंशी | Published: September 28, 2022 05:58 PM2022-09-28T17:58:50+5:302022-09-28T18:46:21+5:30
दुर्गेच्या नऊ अवतारांपैकी हा नववा अवतार
कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळेला आज, बुधवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची सिद्धीदात्री देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. दुर्गेच्या नऊ अवतारांपैकी हा नववा अवतार आहे. देव, मानव आणि दानवांनाही सिद्धी प्रदान करणारी देवी, असा या देवतेचा लौकिक आहे.
नवरात्रोत्सवात रोज अंबाबाईची वेगवेगळ्या स्त्री देवतेच्या रूपात पूजा बांधली जाते. यंदाच्या सर्व पूजा दुर्गेच्या विविध रूपातील असून सिद्धीदात्री हे नववे रूप आहे. सिद्धी म्हणजे असामान्य क्षमता. मार्कंडेय पुराणानुसार अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व व वशित्व या आठ सिद्धी आहेत. म्हणजेच शरीराला अति सूक्ष्म, अतिविशाल, अदृश्य होण्याची, ईश्वर स्वरूप मिळणारी, एखाद्याला आपला दास करणारी शक्ती.
देवी पुराणानुसार भगवान शंकरांनी सिद्धीदात्रीच्या कृपेनेच सिद्धी मिळवल्या, तसेच तिच्या अनुकंपेने त्यांचे अर्धे शरीर देवीचे झाले, त्यामुळे शंकराला अर्धनारीश्वर म्हटले जाते. श्री सिद्धीदात्री ही कमलासनावर विराजमान असून चर्तुभुज आहे. तिने शंख, चक्र, गदा व कमळ धारण केले आहे. ही पूजा पुजारी अनिल कुलकर्णी, नारायण कुलकर्णी, प्रसाद लाटकर, श्रीनिवास जोशी यांनी बांधली.
कोल्हापूर: सिद्धीदात्री देवीच्या रूपात अंबाबाईची पूजा.#navratri2022#Kolhapurpic.twitter.com/kQoDgD94uk
— Lokmat (@lokmat) September 28, 2022