चौथ्या माळेला अंबाबाईची मीनाक्षी देवीच्या रुपात पूजा, उद्या होणार त्र्यंबोली देवीची भेट

By इंदुमती सूर्यवंशी | Published: September 29, 2022 05:34 PM2022-09-29T17:34:46+5:302022-09-29T18:23:54+5:30

उद्या, शुक्रवारी ललिता पंचमी असून त्र्यंबोली यात्रा होणार आहे. यानिमित्त अंबाबाई आपली प्रिय सखी त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी जाते. छत्रपतींच्या उपस्थितीत येथे कोहळा भेदनाचा विधी होतो.

Worship of Sri Ambabai as Meenakshidevi on the 4th Mala of Sharadiya Navratri Festival | चौथ्या माळेला अंबाबाईची मीनाक्षी देवीच्या रुपात पूजा, उद्या होणार त्र्यंबोली देवीची भेट

छाया : आदित्य वेल्हाळ

Next

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला करवीर निवासिनी श्री अंबाबाईची मीनाक्षीदेवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. उद्या, शुक्रवारी ललिता पंचमी असून त्र्यंबोली यात्रा होणार आहे. यानिमित्त अंबाबाई आपली प्रिय सखी त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी जाते. छत्रपतींच्या उपस्थितीत येथे कोहळा भेदनाचा विधी होतो.

भगवान शंकराच्या जटेतून निघालेल्या मधूर अमृतापासून मदुराई नगरीची निर्मिती झाली. याआधी तिथे कदंबाचे वन होते. येथील एका वृक्षाखाली शंकराचे स्वयंभू लिंग होते. त्याची पूजा मलयध्वज राजा व त्याची पत्नी कांचनमाला यांनी केली. प्रसन्न होऊन त्यांना शंकरांनी तुम्हाला पार्वतीच्या अंशाने कन्यासंतान होईल असा वर दिला. त्यानुसार त्यांना मुलगी झाली. विशाल सुंदर डोळ्यांमुळे त्यांनी तीचे नाव मीनाक्षी ठेवले. पण तिला जन्मत: तीन स्तन होते. त्यावेळी भगवान शंकरांनी तिला शंकररुपाचे दर्शन झाल्यावर तिची या वैगुण्यातून मुक्तता होईल असा वर दिला. पुढे मीनाक्षी देवीने हिमालयापर्यंत राज्ये काबीज केली. पुढे जाताना तिला सुंदरेश्वराचे दर्शन झाले आणि तिचा तिसरा स्तन नाहीसा झाला. त्या दोघांचा विवाह झाला. त्यांनी मदुराईवर अनेक वर्षे राज्य केले.

श्री मीनाक्षी देवीची मूर्ती रत्नजडित स्वरुपसुंदर व रेखीव आहे. ही मूर्ती द्विभूज असून तिच्या उजव्या हातात प्रेमाचे प्रतिक असलेला पोपट व पुष्पगुच्छ आहे. केयूर (बाजूबंद) व हार ही तिची मुख्य आभूषणे आहेत. मीनाक्षी देवीच्या आराधनेमुळे विवाह, संसार, संतान सुख आणि प्रेम मिळते अशी श्रद्धा आहे. ही पूजा पुजारी अनिल कुलकर्णी, आशुतोष कुलकर्णी, सचिन ठाणेकर, श्रीनिवास जोशी यांनी बांधली. त्यांना नारायण माजगांवकर व विजय माजगांवकर यांनी सहकार्य केले.

Web Title: Worship of Sri Ambabai as Meenakshidevi on the 4th Mala of Sharadiya Navratri Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.