Navratri 2024: पाचव्या माळेला अंबाबाई सरस्वती रूपात, उद्या जाणार त्र्यंबोली देवीच्या भेटीला
By इंदुमती सूर्यवंशी | Published: October 7, 2024 06:23 PM2024-10-07T18:23:45+5:302024-10-07T18:25:43+5:30
कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवात पाचव्या दिवशी सोमवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची सरस्वती देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. उद्या मंगळवारी ललिता ...
कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवात पाचव्या दिवशी सोमवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची सरस्वती देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. उद्या मंगळवारी ललिता पंचमीनिमित्त अंबाबाई त्र्यंबोली देवीच्या भेटीला जाणार आहे. सकाळी साडेदहा वाजता देवीची उत्सवमूर्ती असलेली पालखी शाही लव्याजम्यानिशी त्र्यंबोली टेकडीसाठी प्रस्थान करील.
नवरात्रोत्सवात रोज अंबाबाईची वेगवेगळ्या रूपात पूजा बांधली जाते. सोमवारी अंबाबाईने सरस्वती देवीच्या रूपात अवतरीत होऊन भक्तांना आशीर्वाद दिले. श्री सरस्वती ही सत्त्वगुणप्रधान, ज्ञान, बुद्धी, वाचा, विद्या, कला संगीत, शिक्षणाची अधिष्ठात्री आहे. ऋग्वेदात सरस्वती देवीला अनेक स्तोत्रे समर्पित केली आहेत. जी कुंदपुष्प, चंद्र आणि मोत्यांच्या हाराप्रमाणे शुभ्र आहे. जिने शुभ्र वस्त्र परिधान केले आहे. जिच्या हातात श्रेष्ठ अशी वीणा आहे. जी श्वेत कमलासनावर बसली आहे. जी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना सदैव वंदनीय आहे.
चतुर्भुजा सरस्वतीच्या हातामध्ये अक्षमाला, वीणा व पुस्तक शोभायमान आहे. तिचे वाहन हंस आहे. सरस्वतीला शारदांबा असेही म्हटले जाते. देवीची वैष्णोदेवी (काश्मीर), शृंगेरी (कर्नाटक), बासर (तेलंगणा ) येथे प्रसिद्ध मंदिरे आहेत. ही पूजा विद्याधर मुनीश्वर, मयूर मुनीश्वर, अरुण मुनीश्वर यांनी बांधली.
ललिता पंचमीनिमित्त अंबाबाई आपली प्रिय सखी त्र्यंबोली देवीच्या भेटीला जाते. त्यामुळे उद्या मंगळवारी सकाळचा अभिषेक झाल्यानंतर देवीची पालखी शाही लव्याजम्यानिशी त्र्यंबोली टेकडीला प्रस्थान करील. दुपारी १२ वाजता शाहू छत्रपतींकडून कुमारिकेचे पूजन झाल्यानंतर कोहळा भेदनाचा विधी होईल. त्यानंतर सर्व पालख्या मार्गस्थ होतील. अंबाबाईची पालखी सायंकाळी ५ वाजता मंदिरात परत येईल.