बावड्यात नवदाम्पत्याचा घरात घुसून निर्घृण खून

By admin | Published: December 17, 2015 01:57 AM2015-12-17T01:57:07+5:302015-12-17T01:58:03+5:30

आॅनर किलिंगचा संशय : चाकूने भोसकले; दोन संशयित ताब्यात

In the worst case, bloodless entry into a bidder's house | बावड्यात नवदाम्पत्याचा घरात घुसून निर्घृण खून

बावड्यात नवदाम्पत्याचा घरात घुसून निर्घृण खून

Next

कोल्हापूर / कसबा बावडा : कसबा बावडा येथील गोळीबार मैदानानजीकच्या गणेश कॉलनीत बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घरात घुसून दोन अज्ञातांनी नवदाम्पत्याचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली. इंद्रजित श्रीकांत कुलकर्णी (वय २८) व पत्नी मेघा (२३) असे खून झालेल्या दाम्पत्याचे नाव असून, घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले. दुहेरी खून झाल्याचे समजताच कसबा बावडा परिसरात एकच खळबळ उडाली. हा प्रकार आॅनर किलिंगचा असण्याची शक्यता असून दोघांना रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.
घटनेचे गांभीर्य ओळखून नूतन जिल्हा पोलीसप्रमुख प्रवीण देशपांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी हा खून प्रेमविवाह केल्याच्या कारणातून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून, त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सातवे (ता. पन्हाळा) येथील इंद्रजित कुलकर्णी याचा थेरगाव (ता. शाहूवाडी) येथील मेघा पाटील हिच्याशी २४ जून २०१४ ला पे्रमविवाह झाला होता. या प्रेमविवाहाला दोघांच्या कुटुंबीयांचा विरोध होता. तो डावलून त्यांनी प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर हे दोघेही वर्षभर बाहेर राहत होते. सहा महिन्यांपासून ते गोळीबार मैदानाजवळील गणेश कॉलनीतील प्रभाकर पांडुरंग माधव यांच्या घरी पहिल्या मजल्यावर भाड्याने राहत होते. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास दोन अज्ञात तरुणांनी त्यांच्या घरात घुसून त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यांचा आवाज ऐकून घरमालकीण बाहेर आल्या. यावेळी अंदाजे २० ते २५ वयोगटांतील दोन तरुण जिन्यावरून खाली पळत असल्याचे त्यांना दिसले. हे पाहून त्यांनी आरडाओरड सुरू करताच गल्लीतील नागरिक जमा झाले. गणेश कॉलनीत खून झाल्याचे समजताच शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद चौधरी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी आला.
त्यांनी घरमालक माधव व नागरिकांबरोबर चर्चा केली असता मृत कुलकर्णी दाम्पत्य हे सहा महिन्यांपूर्वीच येथे राहण्यास आल्याचे पोलिसांना समजले.
दरम्यान, सध्या विधान परिषद निवडणुकीची धामधूम सुरू आहे. कसबा बावडा हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. तेथे एकाच वेळी दोन खून झाल्यामुळे या खुनाचे कारण काय? याबद्दल पहिल्यांदा प्रचंड उत्सुकता होती. अनेक जाणकार नागरिकांनी दैनिकांच्या कार्यालयांमध्ये फोन करून या खुनाच्या कारणासंबंधी विचारणा केली. खुनाचे कारण राजकीय तर नाही ना? असे ते विचारत होते.
सातवेतील कुटुंबीय कोल्हापूरकडे
इंद्रजित सातवे (ता. पन्हाळा) येथील आहे. त्यांच्या कुटुंबीयांना रात्री पोलिसांनी या खुनाची माहिती दिली. त्यांची दोन घरे सातवे येथे आहे. खुनाची माहिती मिळताच घरातील सर्वजण तातडीने कोल्हापूरला रवाना झाल्याचे आमच्या देवाळेच्या वार्ताहराने कळविले आहे.
बावडा हादरला...
कसबा बावड्यातील अलीकडच्या काळातील ही पहिलीच खुनाची घटना आहे. या दुहेरी खुनामुळे बावडा परिसर मात्र हादरून गेला. (प्रतिनिधी)


शाहूवाडीत दोघे ताब्यात
पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यानंतर हल्लेखोरांना पकडण्यासाठी शहरात नाकाबंदी केली. रात्री उशिरा शाहूवाडी येथे दोन संशयित तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले. यातील एकाचे नाव गणेश असल्याचे समजते. प्रतिष्ठेच्या कारणावरूनच हे खून झाल्याची घटनास्थळी चर्चा होती.
शालेय जीवनातच प्रेम...!
इंद्रजित व मेघा यांचे प्रेमसंबंध हे शालेय जीवनातच जुळले. दोघांच्या कुटुंबीयांना या प्रेमप्रकरणाची माहिती समजल्यावर घरच्यांनी त्याला तीव्र विरोध केला. तरीही त्यांनी प्रेमविवाह केला होता.

पहिला हल्ला मेघावर ?
प्रभाकर माधव यांच्या दुमजली आरसीसी घराच्या पहिल्या मजल्यावर कुलकर्णी हे दाम्पत्य राहत होते. बुधवारी रात्री मेघा बाथरूममध्ये होती. हल्लेखोरांनी घरात प्रवेश करून ती बाथरूममधून बाहेर पडताच तिला भोसकले. त्यात ती जागीच मृत झाली. याचवेळी इंद्रजित बाजार करून जिन्यावरून वर येत असतानाच हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. इंद्रजित किंचाळला. त्याचा आवाज ऐकून घरमालकीण वंदना माधव या बाहेर येऊन जिन्याच्या पायऱ्यांवर थांबल्या होत्या. यावेळी हल्लेखोर त्यांना ढकलून पसार झाले.

पाळत ठेवून गेम...
हे दाम्पत्य कोठे राहते, किती वाजता कोण घरी असते, यासंबंधी सर्व माहिती घेऊन त्यानुसार पाळत ठेवून, नियोजनबद्धरीत्या दोघांचाही गेम केला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

मृत इंद्रजित हा औषध दुकानात कामास होता. गेले दोन महिने तो काही काम करत नव्हता, तर मेघा ही एका मॉलमध्ये कामास होती.
हल्लेखोरांपैकी एकाने लाल शर्ट परिधान केला होता, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.

Web Title: In the worst case, bloodless entry into a bidder's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.