अतिक्रमणांवर ‘घाव’
By admin | Published: May 27, 2014 12:48 AM2014-05-27T00:48:39+5:302014-05-27T00:48:56+5:30
महापालिकेची कारवाई : तावडे हॉटेल परिसरातील अवैध मिळकती जमीनदोस्त
कोल्हापूर : मोठा पोलीस फौजफाटा, सात डंपर, चार जेसीबी मशीन, दोन बुम, पाच ब्रेकर, दोन गॅस कटर, एक पोकलँड, एक फायर, दोनशेहून अधिक कर्मचार्यांचा लवाजमा सकाळी नऊ वाजल्यापासूनच विभागीय कार्यालय क्रमांक - चार येथील ताराराणी चौकात थांबला होता. सव्वादहाच्या सुमारास सर्व पथके राष्टÑीय महामार्गाजवळील तनवाणी हॉटेलजवळ आली. यावेळी सर्वांत प्रथम नवीन सुरू असलेली बांधकामे पाडू, तोपर्यंत इतर व्यापार्यांना साहित्य हलविता येईल, अशी मोहीम ठरविण्यात आली. चार जेसीबी मशीनसह चार पथके करून एकाचवेळी कारवाई करण्याची व्यूहरचना अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त संजय हेरवाडे व शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी आखली. या योजनेनुसार १० वाजून ४० मिनिटांनी कारवाई सुरू झाली. सर्वांत प्रथम तनवाणी लिकरच्या शेजारील नवीन इमारत पाडण्यास सुरुवात झाली. अर्ध्या तासाने इमारत मालक नानक सुंदराणी यांनी कारवाई थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करीत त्यास दूर ढकलत नेले. दरम्यान, नगरसेवक निशिकांत मेथे व रवी इंगवले यांनी जुजबी कारवाई करू नका, एकाच ठिकाणी न थांबता थोडी थोडी प्रत्येक इमारत पाडत चला. तोंडदेखलेपणा केल्यास गाठ आमच्याशी आहे, असा सज्जड दमच प्रशासनाला दिला. त्यानंतर कारवाईने वेग घेत पहिल्या दोन-अडीच तासांत सुमारे वीसहून अधिक मिळकतींवर जेसीबी लावत मोठ्या प्रमाणात बांधकामे पाडली. नव्याने बांधकाम सुरू असलेल्या इमारती, स्टेशनरीचे दुकान, घरगुती साहित्यांचे दुकान, कापडाची दोन दुकाने, रंगसाहित्याचे दुकान, कटलरी, साहिल फोम अँड फर्निशिंग, पडदे व अंतर्गत सजावटीचे शोरूम, इलेक्ट्रॉनिक्स मॉल, आदी अतिक्रमणे जमीनदोस्त केली. ही मोहीम सायंकाळी सहापर्यंत सुरू होती. उद्या, मंगळवारी सकाळी दहा वाजता पुन्हा मोहीम सुरू करण्यात येणार असल्याने अतिक्रमित जागेवरील व्यापार्यांनी साहित्य हलवून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास महापौर सुनीता राऊत व स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांनी कारवाईच्या ठिकाणी भेट दिली. मिळकतधारकांनी महापौरांना निवेदन देऊन कारवाई एक महिन्यासाठी पुढे ढकलण्याची मागणी केली. परंतु, महापौरांनी यावेळी, न्यायालयाचा निर्णय झाला आहे. महापालिकेच्या मालकीच्या जागांवर असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई होणारच, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी) राजू डकरे यांचा हस्तक्षेप माजी नगरसेवक राजू डकरे यांनी अनेक ठिकाणी कारवाई थांबविण्याबाबत हस्तक्षेप केला. त्यांनी आहुजा इलेक्ट्रॉनिक्स शेजारील घर सजावटीच्या दुकानासह इतर मिळकतधारकांवर कारवाई करताना विरोध केला. ‘साहेबांचा निरोप आहे, कारवाई थांबवा’, असे ते अधिकार्यांसह नगरसेवकांना सांगत होते. मात्र, नगरसेवकांनी जोर लावल्याने डकरेंनी काढता पाय घेतला. ‘पीए’ची धडपड आहुजा इलेक्ट्रॉनिक्सवरील कारवाई थांबवावी. त्यांना थोडा अवधी देऊया, अशी विनंती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे ग्रामीण विभाग जनसंपर्क प्रमुख बजरंग रणदिवे यांनी केली. मात्र, रणदिवे यांचे आहुजा यांना वाचविण्याचे प्रयत्न बाद ठरवित प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरूच ठेवला. रणदिवे यांची कारवाई थांबविण्यासाठी चाललेली धडपड पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. महेश जाधव यांचे प्रयत्न कोल्हापूर शहर दक्षिण मतदारसंघातील भाजपचे संभाव्य उमेदवार महेश जाधव हे सायंकाळी चार वाजता कारवाईच्या ठिकाणी आले. त्यांनी व्यापार्यांची बाजू घेत कारवाई थांबविण्याची विनंती प्रशासनास केली. मात्र, प्रशासन कारवाईबाबत ठाम राहिल्याने व्यापार्यांना साहित्य काढेपर्यंत वेळ देण्याची विनंती करून जाधव निघून गेले. पंचनामा होणार रस्त्यापासून २४ मीटरची बांधकामे उद्यापासून काढली जाणार आहेत. याची आखणी आज केली. यानंतरची बांधकामे मिळकतधारकाांनी स्वत: काढावयाची आहेत. तसेच इमारतीमध्ये असलेल्या वस्तूंचा पंचनामा करण्यात आला. उद्या सकाळपर्यंत साहित्य न हलविल्यास साहित्यांसह इमारत जमीनदोस्त केली जाणार असल्याची माहिती उपअभियंता एम. एम. निर्मळे यांनी दिली.