वाह, क्या बात है! कलादालनात विशेष मुलांचे चित्रप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 11:26 AM2019-03-04T11:26:54+5:302019-03-04T11:31:29+5:30
निसर्गाने शरीरात उणिवा ठेवल्या म्हणून काय झाले? मन तरी आम्ही घडवू शकतो. मनातील भावभावनांना आकार देऊ शकतो. त्यातून आयुष्याच्या कॅन्व्हासवर जगण्याचे उत्तम चित्र रेखाटू शकतो, याची प्रचितीच शाहू स्मारक भवनच्या कलादालनात विशेष मुलांनी काढलेली सुंदर चित्रे पाहून येत आहे.
कोल्हापूर : निसर्गाने शरीरात उणिवा ठेवल्या म्हणून काय झाले? मन तरी आम्ही घडवू शकतो. मनातील भावभावनांना आकार देऊ शकतो. त्यातून आयुष्याच्या कॅन्व्हासवर जगण्याचे उत्तम चित्र रेखाटू शकतो, याची प्रचितीच शाहू स्मारक भवनच्या कलादालनात विशेष मुलांनी काढलेली सुंदर चित्रे पाहून येत आहे. कुणीही सहज प्रेमात पडावे अशी ही चित्रे पाहताक्षणीच ‘वाह, क्या बात है!’ अशी दाद तर मिळवत आहेतच; शिवाय ती विकत घेऊन कलेला आर्थिक बळही मिळत आहे. उद्घाटनादिवशीच लाखभर रुपयांना पाच चित्रे विकली गेली.
कसबा बावड्यातील स्वयंम या शाळेतील मतिमंद अर्थात विशेष मुलांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन रविवारपासून दसरा चौकातील शाहू कलादालनात सुरू झाले. ९ मार्चपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी सकाळी उद्योगपती विनोद घोडावत यांनी केले.
यावेळी क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष महेश यादव, क्रिडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष राजीव परिख, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे व्ही. बी. पाटील, सतीशराज जगदाळे, निरंजन वायचळ, महेंद्र परमार, अमरदीप पाटील, शोभा तावडे, कलाशिक्षक बाजीराव माने प्रमुख उपस्थित होते.
प्रदर्शनात स्वयंम शाळेच्या उद्योगकेंद्रातील १० मुलांनी काढलेली ४० चित्रे आहेत. यात सौंदर्य, आनंद, ऊर्जा, जमीन, तारांगण, वादळ, महत्त्वाकांक्षा, सोबत अशा मनातील भावभावना दर्शविल्या आहेत. गेल्या चार महिन्यांपासून अविरत कष्टातून या मुलांनी ही चित्रे तयार केली आहेत. फ्रेमिंगसह जवळपास ७० हजारांवर खर्च झाला आहे. या प्रदर्शनात चित्रांबरोबरच मुलांनी तयार केलेल्या फाईल्स, विविध कलात्मक वस्तूही येथे आहेत.
जहाँगीर आर्ट गॅलरीत लवकरच प्रदर्शन
स्वयंमच्या शाळेतील मुलांनी तयार केलेल्या या चित्रांचे प्रदर्शन पहिल्यांदाच कोल्हापुरात होत आहे. आता पुढील टप्प्यात जहाँगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरविण्याचे नियोजन आहे. एकदा तरी मुंबईच्या या जहाँगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरावे, असे प्रत्येक चित्रकाराचे स्वप्न असते.
कलेची किंमत ठरवता येत नाही, तशी विशेष मुलांनी तयार केलेल्या चित्रांचीही किंमत ठरवण्यात आलेली नाही. मुलांना प्रोत्साहन मिळावे याच हेतूने प्रदर्शन भरले आहे; पण ज्याला कुणाला ते विकत घ्यायचे असेल त्याने हे चित्र काढण्यामागचे मुलांचे कष्ट, त्यांच्या जाणिवा आणि या चित्रांतून या मुलांसाठीच साधने घेण्यासाठी मदत होणार आहे, हे लक्षात ठेवावे, एवढीच संयोजकांची भावना आहे.