सहा दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी, कुस्तीपटू निलेश कंदूरकरचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2018 08:10 AM2018-04-06T08:10:16+5:302018-04-06T15:34:10+5:30
मानेवर पडून गंभीर जखमी झालेला मल्ल निलेश विठ्ठल कंदूरकर याचं निधन झालं आहे.
कोल्हापूर/कऱ्हाड - कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील बांदिवडे येथे कुस्ती खेळताना मानेवर पडून गंभीर जखमी झालेला मल्ल निलेश विठ्ठल कंदूरकर याचं निधन झालं आहे. निलेशवर कऱ्हाडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. पण निलेशची मृत्यूशी झुंज संपली असून शुक्रवारी पहाटे 4 वाजता निलेशचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
आखाड्यात घाम गाळणारा मल्ल नीलेश कुस्ती खेळताना अपघातानं जायबंदी झाला. ज्या खेळात नाव कमवायचं, त्याच खेळात त्याने जीव गमावला. त्याच्या या अकाली जाण्यानं कोल्हापूरचा आखाडा उमद्या मल्लाला पोरका झालाय. तर सातारा, सांगली अन् कोल्हापूरच्या लाल मातीचाही हुंदका दाटलाय.
येथील कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील बादेवाडी गावचा पैलवान नीलेश कुरूंदकरने शुक्रवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. गेले सहा दिवस त्याची मृत्यूशी झुंज सुरू होती. त्याच्या मृत्यूची वार्ता सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत वाऱ्यासारखी पसरली आणि शेकडो कुस्तीप्रेमींनी कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात गर्दी केली.
कोल्हापूर जिल्ह्यातील बांदिवडे येथे जोतिबा यात्रेच्या कुस्ती मैदानात मंगळवारी कुस्ती खेळताना वीस वर्षांचा पैलवान नीलेश कुरूंदकरला दुखापत झाली. निपचित पडलेल्या या पैलवानाला कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. येथील तज्ज्ञ डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते.
कृष्णा उद्योग समूहाचे डॉ. अतुल भोसले यांनीही सर्वतोपरी उपचार करण्याच्या सूचना तज्ज्ञ डॉक्टरांना दिल्या होत्या. गुरुवारी मणक्याला झालेली दुखापत बरी करण्यासाठी त्याला वजनही लावण्यात आले होते. तर रक्तदाब स्थिर होण्यासाठीही शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र, उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता त्याची प्राणज्योत मावळली आणि कुरूंदकर परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला.
अवघ्या १९ वर्षांच्या नीलेशचे कुस्तीवर अपार प्रेम होतं. त्यामुळे माजी कुस्तीगीर असलेले वडील विठ्ठल कंदूरकर यांनी त्याला वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे कुस्ती संकुलात कुस्तीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यासाठी घातलं. भारदस्त शरीरयष्टीचा असलेला निलेश मनमिळावू व नम्र स्वभावाचा ओळखला जायचा.
बांदिवडे येथे एका मैदानात प्रतिस्पर्धी मल्लाने एकचाक डाव टाकताना नीलेश मानेवर पडला. त्यात त्याच्या मणक्यांना जबर मार लागला. त्यामुळे नीलेशच्या शरीराची हालचाल पूर्णपणे मंदावली. त्याला शाहूपुरी येथील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं.
मणक्याला दुखापत झाल्यामुळे त्याचे आॅपरेशन करणे गरजेचे होते. मात्र, नीलेशचा रक्तदाब स्थिर नसल्याने शस्त्रक्रिया करता येत नव्हती. त्यासाठी इंजेक्शन व गोळ्याच्या माध्यमातून रक्तदाब स्थिर राहण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, त्यामध्ये यश आले नाही आणि शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच नीलेशचा मृत्यू झाला.
- डॉ. प्रसन्न पाटणकर
न्युरोसर्जन, कृष्णा हॉस्पिटल