‘करवीर’मध्ये कुस्ती पुन्हा नरके-पी. एन. यांच्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 01:02 AM2019-07-15T01:02:55+5:302019-07-15T01:03:02+5:30

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदारसंघात आमदार चंद्रदीप नरके व कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. ...

Wrestling again in hell in 'Karveer' N. Between them | ‘करवीर’मध्ये कुस्ती पुन्हा नरके-पी. एन. यांच्यातच

‘करवीर’मध्ये कुस्ती पुन्हा नरके-पी. एन. यांच्यातच

Next

राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदारसंघात आमदार चंद्रदीप नरके व कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्येच कुस्ती होणार आहे. नरके यांचा संपर्क की पाटील यांच्याबद्दलची सहानुभूती भारी पडणार, हाच निकालाचा केंद्रबिंदू राहील. सत्ता असो की नसो, ‘पीएन’ या दोन अक्षरांशी जोडलेल्या कार्यकर्त्यांचे जाळे आजही त्यांच्या पाठीशी कायम आहे. त्या बळावरच ते यावेळेलाही आव्हान देण्याच्या; तर नरके हे आव्हान परतवून लावीत हॅट्ट्रिकच्या तयारीत आहेत.
‘कुंभी’च्या माध्यमातून नरके यांनी मतदारसंघात चांगला जनसंपर्क राबवत समाजातील प्रत्येक घटकाशी सुसंवाद ठेवल्याने सन २००९ व २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी बाजी मारली. निष्ठावंत कार्यकर्त्यांची मजबूत फळी, संस्थात्मक पातळीवरील भक्कम पकड असलेल्या पी. एन. यांना पराभूत करणे तसे सोपे नव्हते; म्हणूनच नरके यांनी पाटील यांचे कच्चे दुवे शोधत काम केले आणि यश मिळविले. सन २००९ ला नरके यांनी ५६२४ मतांनी पाटील यांचा पराभव केला. सन २०१४ शिवसेनेकडून चंद्रदीप नरके, कॉँग्रेसकडून पी. एन. पाटील, भाजप-जनसुराज्यकडून राजेंद्र सूर्यवंंशी, के. एस. चौगुले यांच्यासह आठजण रिंगणात होते तरी खरी लढत नरके व पाटील यांच्यातच झाली. राज्यातील विक्रमी ८४.३१ टक्के झालेल्या मतदानात नरके यांना विजयासाठी शेवटपर्यंत झुंजावे लागले. बालेकिल्ला पन्हाळ्यात नरके यांनी १५ हजारांचे मताधिक्य घेत विजयाकडे वाटचाल केली. गगनबावड्यात २००९ ला ते साडेतीन हजारांनी मागे होते. त्याची परतफेड करत गगनबावड्यातून करवीरमध्ये येताना १६ हजारांचे मताधिक्य घेऊन नरके आले. जुन्या करवीरमध्ये नरके यांनी ८२६५ चे मताधिक्य घेत २० हजारांचा आकडा पार केला. पण पी. एन. पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या जुन्या सांगरूळमध्ये नरके यांचे मताधिक्य कमी झाल्याने कार्यकर्त्यांचा श्वास रोखला. तथापि अखेर ७१० मतांनी नरके यांनी बाजी मारली.
हा पराभव पाटील समर्थकांच्या जिव्हारी लागला; पण त्यानंतर ज्या आक्रमकपणे संपर्क ठेवायला हवा होता, तो ठेवला नसल्याची लोकांची तक्रार आहे. पाच वर्षांत पाटील यांच्याकडे ‘भोगावती’ची सत्ता आल्याने थोडी ताकद वाढली; पण साखर उद्योग संकटात सापडल्याने त्याचे बरे-वाईट पडसाद उमटत आहेत. नरके यांनाही ‘कुंभी’तील परिस्थितीचा फटका बसू शकतो. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत १० पैकी पाच कॉँग्रेसकडे, तीन शिवसेना, एक भाजप, तर एक अपक्ष सदस्य निवडून आला आहे. कॉँग्रेसचे पारडे जड असले तरी गगनबावड्यातील दोन सदस्य हे आमदार सतेज पाटील यांचे आहेत. त्यामुळे तसे दोन्ही गटांना सारखेच यश मिळाले आहे.
आता युती व आघाडी होवो अथवा न होवो; येथे पुन्हा नरके व पाटील यांच्यातच दुरंगी लढत होणार आहे. नरके यांनी विकास निधी मोठ्या प्रमाणात खेचून आणला आहे. लोकांशी संपर्क ठेवण्यात ते पुढे आहेत. पाटील यांचा संपर्क कमी आहे. त्यातच ‘गोकुुळ’ मल्टिस्टेट व नोकरभरतीमुळे कॉँग्रेसअंतर्गतच नाराजी आहे. मतदारसंघात ‘शेकाप’, राष्टÑवादी, जनसुराज्यची कमी-अधिक प्रमाणात ताकद आहे. गेल्या निवडणुकीत राजेंद्र सूर्यवंशी यांनी १९ हजार मते मिळविली. त्यांना काँग्रेसमध्ये घेऊन पी. एन. यांनी करवीरचे सभापती केले. त्यांचा त्यांना या निवडणुकीत फायदा होऊ शकतो. लोकसभा निवडणुकीत ‘शेकाप’ दोन्ही कॉँग्रेसच्या आघाडीसोबत राहिला. संपतराव पवार व पी. एन. पाटील हे विरोधक असल्याने येथे पवार यांची भूमिका पाटील यांच्या विरोधातच राहण्याची शक्यता आहे. राष्टÑवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे यांनी घड्याळाचे अस्तित्व टिकवून ठेवले असून, अटीतटीच्या लढतीत राष्टÑवादीची मते निर्णायक आहेत. युती कायम राहिली तर जनसुराज्य आघाडीसोबत राहण्याची शक्यता आहे. तसे झाले तर ‘शाहूवाडीत’ कॉँग्रेस विनय कोरे यांना पाठबळ देईल आणि कोरे करवीरमध्ये पाटील यांच्या पाठीशी राहू शकतात.

‘कुंभी’, ‘भोगावती’चा इफेक्ट
साखर उद्योग अडचणीत असल्याने त्याचा परिणाम ऊस बिले व कामगारांच्या पगारावर झाला. कुंभी नरके यांना, तर ‘भोगावती’त पाटील यांना याचा कमी-अधिक प्रमाणात फटका बसू शकतो.

लाव रे ‘तो’ व्हिडिओ!...
लोकसभा निवडणुकीत ‘मनसे’प्रमुख राज ठाकरे यांनी ‘लाव रे तो व्हिडिओ!’ असे सांगत भाजप सरकारचा पोलखोल केला होता. तोच फॉर्म्युला नरके वापरणार आहेत. टोल व मराठा आरक्षणातील आग्रही भूमिका, ‘गोकुळ’ मल्टिस्टेटविरोधातील लढ्याचे व्हिडिओ त्यांनी तयार ठेवले आहेत.

२०१४ ला कुणाला, किती मते मिळाली?
चंद्रदीप शशिकांत नरके (शिवसेना) - १०७९९८
पी. एन. पाटील (कॉँग्रेस) - १०७२८८
राजू गुंडाप्पा सूर्यवंशी (जनसुराज्य शक्ती) - १८९६५
के. एस. चौगले (भाजप) - ५२५६
अमित गणपती पाटील (मनसे) - १४३७
भगवान विष्णू कांबळे (बहुजन समाज पार्टी) - १०५०
किशोर बाबूराव भाटे (अपक्ष) - ८६२
अरविंद भिवा माने (अपक्ष) - ६३४

पी. एन.यांच्या जमेच्या बाजू
‘गोकुळ’, ‘भोगावती’ची सत्ता, निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संच,
दहा वर्षे आमदारकीमुळे नरके यांच्याबद्दलची नाराजी, दोनवेळच्या पराभवाबद्दलची सहानुभूती.

Web Title: Wrestling again in hell in 'Karveer' N. Between them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.