गावोगावच्या यात्रा-जत्रांतून कुस्तीला लोकाश्रय
By Admin | Published: April 24, 2017 11:40 PM2017-04-24T23:40:08+5:302017-04-24T23:40:08+5:30
शाहूवाडी तालुका : एक रुपयापासून ते एक लाखापर्यंतच्या बक्षिसांची मैदाने
आर. एस. लाड -- आंबा --गावोगावच्या यात्रांची परंपरा कुस्ती खेळातील पैलवानकीचा बाज जपत आहे. कुस्तीच्या फडाभोवती त्या गावची संस्कृती, कुस्ती कलेची जाण, नव्या पिढीतील शरीर कमाईचा वारसा, कुस्तीला पाठबळ देणारी दानशूर मंडळी, अन् कुस्तीसाठी लोकाश्रय मिळवून देणारी संयोजकांची धडपड कुस्तीकलेची समृद्धी जपताना दिसते.
यात्रा म्हटले की, ग्रामदेवतेचा जागर, करमणुकीचा मंच, स्नेहभोजनातील पाहुणचार अन् कुस्ती मैदान ही वैशिष्ट्ये घेऊन साजरी होणारी वार्षिक यात्रा गावची संस्कृती प्रतिबिंबित करते. एक रुपयापासून ते एक लाखापर्यंतच्या बक्षिसांच्या कुस्तीचे मैदान उमद्या मल्लांना व कुस्तीशौकिनांना आकर्षित करते. कोण दानशूर चांदीची गदा देणारी पंरपरा जपतो. तर एखादा समालोचक तालुकाभरची मैदाने कुस्तीच्या गाथेने स्फूर्तीदायक बनवितो.
राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या कुस्ती कलेला राजाश्रय मिळवून दिला. तो वारसा गावच्या यात्रा लोकाश्रयातून जपत आहेत. लोकसहभागाच्या पाठबळावर खेड्यापाड्यातील तरुण कुस्तीचा छंद आजा-पणजोबापासून जपत आहेत. कुस्तीगिरीबरोबर वस्तादगिरी अन् कुस्तीचे फड भरविणारे शिलेदार गावपांढरीचा कसदारपणा जपत आहेत. हजारो शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडण्यासाठी खेड्यापासून ते शहरापर्यंतचे मल्ल वर्षभर मातीची रग जपून, गावोगावच्या मानाच्या गदा खांद्यावर मिरविण्यास यात्रेकडे डोळे लावून बसतात. यात्रेचा हंगाम सुरू झाला की तालमीतील रात्र दिवसाचे बाळसे घेते अन् शड्डूचा महिमा घुमू लागतो. नाक्यावरील डिजिटलवरची महाराष्ट्र केसरी विजेत्या पैलवानांची झुंज यासारखे मथळे फेट्यातील शेतकऱ्यांमध्ये पैलवानकीची ऊर्मी जागवते अन् हवेत पटका घुमवतच ‘वारे व्वा पट्ट्या’ची आरोळी देत मैदानाचा कोपरा अन् कोपरा फुलतो. चिमुकल्याची रुपयाची कुस्ती एकीकडे, तर हजारोंची कुस्ती पलीकडे रंगते. एकलंगी, धोबीपछाड, सुईदोरा हे डावपेच बहरतात. एक-एक करीत लाखाच्या कुस्तीचा सांज चढतो अन् हृदयाचा ठोका चुकविणारी चटकदार कुस्ती करणारा पैलवान गावच्या गळ्यातील ताईत बनून जातो. तर कधी बरोबरीत सोडविणारी नुरा कुस्तीशौकिनांचा भ्रमनिरासही करते.
‘जगात भारी कोल्हापुरी’ म्हणत लाल मातीत पैलवानकीचा कस लावणारी मंडळी यात्रांच्या तारखा सांभाळणारे कॅलेंडर जपत घराणे, गाव अन् तालमीच्या नावाच्या गौरवात शिरपेच रोवणारी पैलवानगिरी मिरवितात. यात्रेतील मल्लांचा गौरव पाहून चिमुरडीही तालमीत घाम गाळत शड्डू ठोकताना दिसतात? पहाटे तालमीत शरीरयष्टी घडवायची अन् नदीत डुबकी मारून, वैरणीचा बोजा घेऊन घरी परतणारे चित्र आजही गावच्या वेशीवर दिसते. अख्खी हयात कुस्तीत घालविणारी ज्येष्ठ मंडळी उतारवयात तालमीच्या वस्तादपदी विराजमान होऊन, समाजाप्रती उत्तरदायित्व स्वीकारून, पुढील पिढी पैलवानकीकडे वळवत गावचे नाव उज्ज्वल करण्यास धडपडत आहेत.
मातीतील कुस्तीकडून मॅटवरील कुस्तीकडे पाऊले पडत आहेत. शित्तूरचा कामगार केसरी समिंदर जाधव असो की जाकार्तावीर बंडा पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते वसंत पाटील असोत गावच्या मैदानावर हरियाना, पंजाबातील पैलवानांना अस्मान दाखवित कुस्ती छंद जपत आहेत.
वारणेच्या काठावरील शित्तूर-वारुण, रेठरे, भेडसगाव, हारुगडेवाडी, शिवारे, वारणा कापशी, सरूड, सोनवडे, तर कडवी खोऱ्यातील पेरीड, कोपार्डे, परळे, कडवे, येलूर, शिरगाव, साळशी, पिशवी, बांबवडे या गावांतील मल्लांनी कुस्ती परंपरा अटकेपार नेली. यामध्ये बंडा पाटील, महिपती केसरे, दामाजी पाटील, दौलत पाटील, रंगराव कदम, बाजीराव केसरे, सुभाष सनगर, विजय बोरगे, शिवाजी पाटील, सचिन देसाई या मल्लांनी कुस्ती परंपरेचा लौकिक वाढविला. आॅलिम्पिक स्पर्धांमधील भारतीय मल्लांची कामगिरी ग्रामीण भागातील कुस्तीला अन् अडगळीतील तालमींना नवसंजीवनी देत आहे.