परदेशी पाहुण्यांनी ‘खासबाग’मध्ये घेतले कुस्तीचे धडे
By admin | Published: April 15, 2017 01:04 AM2017-04-15T01:04:20+5:302017-04-15T01:04:20+5:30
एझिया एक्स्प्रेस टीव्ही शो : साहसी खेळासाठी पुढे साताऱ्याला रवाना
कोल्हापूर : बेल्जियममधील एका संस्थेच्या रिअॅलिटी गेम शो आणि माहितीपटाच्या निमित्ताने कोल्हापुरात दाखल झालेल्या परदेशी पर्यटक स्पर्धकांनी शुक्रवारी सकाळी भल्या पहाटे राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानाला भेट दिली. यावेळी त्यांनी कुस्तीचे धडे आणि प्रात्यक्षिकही केले. बेल्जियम येथील ‘एझिया एक्स्प्रेस’ या ट्रेझर हंट पद्धतीच्या साहसी टीव्ही गेम शोच्या मालिकेसाठी मूळचे पोलंडवासीय असलेले सहा स्पर्धक गेले दोन दिवस कोल्हापुरात आले आहेत. त्यांचा प्रवास श्रीलंकेतून सुरू झालेला आहे. ते भारतातील केरळ, तमिळनाडू, कर्नाटक असा प्रवास करीत कोल्हापुरात दाखल झाले होते. गुरुवारी (दि. १३) कोल्हापुरातील टाऊन हॉल, गंगावेश, रंकाळा, आदी भागांतून त्यांना चिठ्ठ्या टाकून पुढील ठिकाण सुचविले जात होते. त्यानुसार गेले दोन दिवस विविध ठिकाणी चिठ्ठी काढल्यानंतर ते ठिकाण मोबाईल ट्रॅकरद्वारे शोधून काढतात. यासाठी ते ‘गुगल मॅप’चा आधार घेतात. चिठ्ठीमध्ये असलेले ठिकाण त्यांना मिळाल्यानंतर ते पुढील स्थानासाठी मार्गस्थ होतात. शुक्रवारी ते कोल्हापूरहून साताऱ्याकडे रवाना झाले. तेथून पुढे अलिबाग व मुंबई या शहरांत ते साहसी खेळ व ठिकाण शोधणार आहेत. प्रवासाच्या निमित्ताने त्या-त्या प्रांतांतील सांस्कृतिक, नैसर्गिक, धार्मिक स्थानांचे दर्शन व्हावे, ते जगातील लोकांनाही शोच्या निमित्ताने पाहता यावे, या उद्देशाने कोल्हापुरात दाखल झालेले हे स्पर्धक शुक्रवारी पहाटे पाच वाजता राजर्षी शाहू कुस्ती मैदान येथे दाखल झाले. या ठिकाणी मोतीबाग तालीम येथील मल्लांनी या स्पर्धकांना कुस्तीची प्रात्यक्षिके दाखविली. सहापैकी दोन स्पर्धकांमध्ये कुस्तीही लावण्यात आली. कुस्ती प्रात्यक्षिकांनंतर या ठिकाणी पुन्हा पुढील ठिकाणाची चिठ्ठी काढण्यात आली. सात वाजता हा खेळ संपल्यानंतर ते पुढील फेरीसाठी जाधवगड, त्यानंतर पुणे, लोणावळा, अलिबागकडे रवाना झाले. या टीव्ही गेम शोसाठी चित्रपट व्यवस्था निर्मिती सहायक म्हणून मिलिंद अष्टेकर यांनी चित्रीकरणासाठी बेल्जियमच्या या कंपनीला साहाय्य केले. या गेम शोनिमित्त १४ चारचाकी गाड्यांचा ताफा गेले दोन दिवस कोल्हापुरात कार्यरत होता.
बेल्जियम येथील ‘एझिया एक्स्प्रेस’हा ट्रेझर हंट पद्धतीचा साहसी टीव्ही गेम शो
या खेळाच्या निमित्ताने मूळचे पोलंडवासीय असलेले सहा स्पर्धक गेले दोन दिवस कोल्हापुरात आले आहेत.
‘एझिया एक्स्प्रेस’ या साहसी टीव्ही गेम शोनिमित्त कोल्हापुरातील खासबाग मैदान येथे शुक्रवारी सकाळी आलेले परदेशी पर्यटक स्पर्धक खेळ संपल्यानंतर पुढील ठिकाणाच्या शोधात मार्गस्थ झाले.