मुरगूडमधील महिला मल्लांचा राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत दबदबा
By admin | Published: October 21, 2016 12:58 AM2016-10-21T00:58:37+5:302016-10-21T00:58:37+5:30
तीन सुवर्णपदकांसह एकूण विविध वजनी गटात दहा पदके
मुरगूड : क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य, पुणे आयोजित कळंब-वालचंदनगर (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुल मुरगूडच्या महिला मल्लांनी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत दबदबा कायम राखला. तीन सुवर्णपदकांसह एकूण विविध वजनी गटात दहा पदके मिळवित सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.
सतरा वर्षांखालील वजनी गटामध्ये ५६ किलो फ्री स्टाईलमध्ये मुरगूडच्या अंकिता शिंदे हिची पहिली लढत पुण्याच्या कोमल अदावडे हिच्याबरोबर झाली. तिला सहज हरवत तिने उपांत्य लढतीत मुंबईच्या सुप्रिया मिश्रा हिला गुणावर हरविले व अंतिम लढतीत तुल्यबळ अशा औरंगाबादच्या तेजस्विनी बारबाल हिच्याबरोबर चिवट झुंज दिली. तिला हरवून अंकिताने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
७० किलो वजनी गटामध्ये सुद्धा मंडलिक आखाड्याच्या वैष्णवी कुशाप्पा हिने अमरावतीच्या वैष्णवी शिंदे, उपांत्य फेरीत पुण्याच्या वैष्णवी धायगुडे हिला, तर अंतिम लढतीत औरंगाबादच्या सुकन्या गोरे हिला हरवून सुवर्णपदक पटकावले; तर ४६ किलो वजनी गटात अनुष्का भाट हिनेही नेत्रदीपक कुस्त्या करीत सुवर्णपदक पटकावले.
या सर्व मल्लांना मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलाचे ठक्कर, कोच दादासाहेब लवटे यांचे मार्गदर्शन लाभले, तर संस्था सचिव संजय मंडलिक, वस्ताद सुखदेव येरुडकर अण्णासाहेब थोरवत, नामदेव मेंडके, पांडुरंग भाट यांचे प्रोत्साहन लाभले. (वार्ताहर)
पदक तक्ता खालीलप्रमाणे
१७ वर्षांखालील मुली ४६ किलो : अनुष्का भारत भाट : सुवर्णपदक, ५६ किलो : अंकिता आनंद शिंदे : सुवर्णपदक,
७० किलो : वैष्णवी रामा कुशाप्पा : सुवर्णपदक, ५२ किलो : सृष्टी जयवंत भोसले : रौप्यपदक,
६५ किलो : ऋतुजा राजेंद्र संकपाळ : रौप्यपदक,
१९ वर्षांखालील मुली - ६३ किलो : शीतल दुधाप्पा पाटील : कांस्यपदक, ७२ किलो : सुकन्या दुंडाप्पा खामकर : रौप्यपदक,
१९ वर्षांखालील मुले : ७६ किलो : पृथ्वीराज पाटील : कांस्यपदक,
१४ वर्षांखालील मुले : ४५ किलो : ऋतुराज रंडे : कांस्यपदक.