मातीशी इमान राखणारा लेखक हवा
By Admin | Published: April 24, 2017 11:43 PM2017-04-24T23:43:08+5:302017-04-24T23:43:08+5:30
श्रीनिवास पाटील : शिराळ्यात राजन गवस यांना ‘समर्पण’ पुरस्कार प्रदान
शिराळा : आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जीवनातील सत्य दडवून चालत नाही, तर त्याला सामोरे जावे लागते. जीवनातील सत्य समाजासमोर ठेवत असताना मातीशी इमान राखणारा लेखक हवा, असे मत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी येथे व्यक्त केले.
शिराळा येथे सोमवारी प्राचार्य शिवाजीराव कुंभार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ज्येष्ठ लेखक प्रा. डॉ. राजन गवस यांना ‘समर्पण सन्मान’ पुरस्कार राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
राज्यपाल पाटील म्हणाले की, समाजाच्या चालीरिती परखडपणे मांडणारा साहित्यिक म्हणून डॉ. राजन गवस यांची ओळख आहे. याबद्दल त्यांना हा ‘समर्पण’ पुरस्कार दिला, ही आनंदाची बाब आहे. जीवनातील सत्य समाजासमोर ठेवत असताना मातीशी इमान राखणारा असा लेखक हवा. प्राचार्य कुंभार जीवनाला आकार देणारा माणूस होता. त्यांनी अनेकांना आधार देऊन समाजासमोर एक आगळावेगळा आदर्श घालून दिला आहे.
यावेळी प्रा. डॉ. गवस म्हणाले की, प्राचार्य कुंभार म्हणजे जिवंत माणूसपणाचा झरा होते. खेड्यापाड्यातील गोरगरिबांचे संसार माणूस चालवत नाही, तर जनावरे चालवतात. आज मरणसुद्धा महाग झाले आहे. शेतात राबणाऱ्या माणसातील श्रम आजच्या शिक्षणाने हद्दपार केले आहे. खेड्यापाड्यांची वाताहत झाली आहे. धाक व लाज हद्दपार झाली आहे.
माजी आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले की, प्र्राचार्य शिवाजी कुंभार दुसऱ्यासाठी जगणारे होते. त्यांनी अनेक विद्यार्थी घडविण्याचे काम केले. त्यांना साहित्य, कला, नाट्य याबद्दल आत्मियता होती.
आयकर आयुक्त अभिनय कुंभार यांनी प्रास्ताविक केले. पवन खेबूडकर यांनी प्रा. डॉ. गवस यांचा, तर एस. एम. पाटील यांनी श्रीनिवास पाटील यांचा परिचय करून दिला.
डी. आर. जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. आर. बी. शिंदे यांनी आभार मानले. यावेळी श्रीमती कल्पना कुंभार, लक्ष्मण कुंभार, सौ. चारुशिला कुंभार, गायत्री खैर, अधिक खैर, सम्राट नाईक, विराज नाईक, अॅड. भगतसिंग नाईक, दिनकर पाटील, विजयराव नलवडे, हंबीरराव नाईक, राजेंद्र नाईक, दि. बा. पाटील, सभापती मायावती कांबळे, प्रा. वैजनाथ महाजन, शामराव पाटील, विश्वास कदम उपस्थित होते. (वार्ताहर)