लिपिकास झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ ‘आरटीओ’त लेखणी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 03:56 PM2020-02-27T15:56:51+5:302020-02-27T15:58:54+5:30
सांगली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कनिष्ठ लिपिकास बुधवारी (दि. २६) अटकावून ठेवलेले वाहन का सोडले, याचा जाब विचारीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीच्या निषेधार्थ प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर येथे गुरुवारी दुपारी कर्मचारी संघटनेने ‘लेखणी बंद’ आंदोलन केले.
कोल्हापूर : सांगली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कनिष्ठ लिपिकास बुधवारी (दि. २६) अटकावून ठेवलेले वाहन का सोडले, याचा जाब विचारीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीच्या निषेधार्थ प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर येथे गुरुवारी दुपारी कर्मचारी संघटनेने ‘लेखणी बंद’ आंदोलन केले.
सांंगली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील खटला विभागातील कनिष्ठ लिपिक दीपक देसाई यांनी रवींद्र चव्हाण (गजानन कॉलनी, कुपवाड रस्ता, सांगली) यांनी तक्रार दिलेला ट्रॅक्टर नियमानुसार कारवाई करीत सोडून दिला. त्यानंतर सदरचा ट्रॅक्टर का सोडला, याबद्दल चव्हाण याने व त्याच्या साथीदाराने देसाई यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून धमकी दिली.
या घटनेनंतर सांगली येथील कर्मचाऱ्यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात चव्हाण याच्याविरोधात गुन्हा नोंद केला. या कृतीबद्दल चव्हाण याच्यावर कठोर कारवाई करावी. घटनेचा निषेध म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा, कऱ्हाड या चार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी गुरुवारी ‘लेखणी बंद’ आंदोलन केले.
या आंदोलनामुळे वाहन कर, वाहन नोंदणी, क्रमांक, आदींवर काही अंशी परिणाम झाला. या आंदोलनात आरटीओ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व्ही. व्ही. ठोंबरे, उपाध्यक्ष यू. एस. मुजावर, कार्याध्यक्ष आर. डी. गुजर, यू. आर. गिते, चिटणीस आय. एम. पुजारी, डी. एस. कापसे, अनिल सूर्यवंशी, एस. आर. मुगळीकर, आर. ए. मगदूम, एस. एस. वाळवेकर, आर. ए. नरसिंगे, एस. डी. कोरवी, डी. ए. पाटील, आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
सांगली येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील लिपिकास मारहाण झाल्याच्या निषेधर्थ गुरुवारी प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर येथे कर्मचाऱ्यांनी ‘लेखणी बंद’ आंदोलन केले.