परीक्षार्थींच्या हातात चुकीची उत्तरपत्रिका
By admin | Published: April 17, 2017 01:05 AM2017-04-17T01:05:28+5:302017-04-17T01:05:28+5:30
‘सेट’च्या परीक्षेतील प्रकार : काही काळ गोंधळ; ६६८० परीक्षार्थी
कोल्हापूर : चुकीची उत्तरपत्रिका मिळाल्याने महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेत (सेट) रविवारी विवेकानंद महाविद्यालयातील केंद्रावर काही विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. उत्तरपत्रिका वितरणातील चुकीमुळे हा गोंधळ निर्माण झाला. पर्यवेक्षक आणि परीक्षेच्या समन्वयकांनी काही विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका बदलून दिल्या, काहीजणांच्या उत्तरपत्रिकांवर स्वाक्षरी करून त्या अधिकृत केल्या. मात्र, यामध्ये विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.
विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे (यूजीसी) अधिव्याख्याता पदावर नियुक्त होण्यासाठी ‘सेट’ परीक्षा घेण्यात येते. कोल्हापुरातील सायबर, विवेकानंद महाविद्यालय, न्यू मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूल, शिवाजी विद्यापीठातील मानव्यशास्त्र इमारत, वि. स. खांडेकर भाषाभवन, रसायनशास्त्र विभाग, तंत्रज्ञान विभाग, पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, महावीर महाविद्यालय, शांतिनिकेतन स्कूल, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, एस. एम. लोहिया ज्युनिअर कॉलेज, राजर्षी शाहू महाराज ज्युनिअर कॉलेज, कॉमर्स कॉलेज,आदी केंद्रांवर रविवारी परीक्षा झाली. सकाळी दहा ते सव्वा अकरा या वेळेत पहिला, सव्वा अकरा ते दुपारी साडेबारामध्ये दुसरा आणि दुपारी दोन ते साडेचार या वेळेत तिसरा पेपर झाला. त्याचे स्वरूप वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असे होते. पहिल्या पेपरवेळी विवेकानंद महाविद्यालय केंद्रावर इंग्रजी विषयाच्या विद्यार्थ्यांना मॅथेमेटिकल सायन्स विषयाची (गणितशास्त्र), तर इंग्रजी विषयाची उत्तरपत्रिका (ओएमआर शीट) मॅथेमेटिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांच्या हातात पडली. चुकीची उत्तरपत्रिका हातात पडल्याचे पेपर सुरू झाल्यानंतर साधारणत: काही मिनिटांतच विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. त्यांनी याची माहिती पर्यवेक्षकांना दिली. या उत्तरपत्रिकांवर बैठक क्रमांक, विषयाचा सांकेतिक क्रमांक, स्वाक्षरीच्या नोंदी केल्या होत्या. संबंधित उत्तरपत्रिका संगणकीय प्रणालीद्वारे तपासल्या जात असल्याने विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका बदलून देण्याची मागणी केली. यावर काही विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका बदलून दिल्या. काहींच्या उत्तरपत्रिकांवर स्वाक्षरी करून त्या अधिकृत करण्यात आल्या. दरम्यान, संबंधित उत्तरपत्रिकांची तपासणी मॅन्युअल पद्धतीने करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी कोल्हापूर केंद्रामधून ८५३१ परीक्षार्थींनी नोंदणी केली होती.
विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही
या परीक्षेत या वर्षी मॅथेमेटिकल सायन्सची उत्तरपत्रिका स्वतंत्र स्वरूपात देण्यात आली. मात्र, विवेकानंद महाविद्यालय केंद्रावरील इंग्रजी व मॅथेमेटिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांना चुकीच्या उत्तरपत्रिकांचे वितरण झाले. वितरणातील चुकीमुळे हा प्रकार घडल्याचे ‘सेट’ परीक्षेच्या कोल्हापूर विभागाचे समन्वयक पी. व्ही. अनभुले यांनी सांगितले. ते म्हणाले, चुकीच्या उत्तरपत्रिकांचे वितरण झाल्याचे लक्षात येताच त्याची माहिती पुणे विद्यापीठातील ‘सेट’ विभागाला दिली. त्यांच्या सूचनेनुसार उत्तरपत्रिका बदलून देण्याबाबत कार्यवाही केली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे.