दहावीची परीक्षा रद्द केली; परीक्षा शुल्क कधी परत करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:24 AM2021-05-17T04:24:17+5:302021-05-17T04:24:17+5:30
कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली आहे. या परीक्षेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील ...
कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली आहे. या परीक्षेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील ५६ हजार ७४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या विद्यार्थ्यांनी भरलेल्या परीक्षा शुल्कापोटी सुमारे २ कोटी ३५ लाख ४९ हजार १७५ रुपये राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे रक्कम जमा झाली आहे. परीक्षा रद्द झाल्याने भरलेल्या शुल्काची रक्कम विद्यार्थ्यांना परत मिळणे अपेक्षित आहे. त्याबाबतच्या शिक्षण मंडळाच्या निर्णयाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागली आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी डिसेंबरपासून पुढे दोन महिने अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी नियमित, विलंब आणि अतिविलंब शुल्क, अशी मुदत होती. परीक्षा शुल्क हे प्रति विद्यार्थी ४१५ रुपये होते. सीबीएसई, आयसीएसई बोर्डाने कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द केली. त्यानुसार राज्य शिक्षण मंडळाने निर्णय घेत परीक्षा रद्द केली. ही परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना हे शुल्क परत मिळणे अपेक्षित आहे. मात्र, त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय शासनाकडून झालेला नाही.
पॉइंटर
जिल्ह्यातील एकूण माध्यमिक शाळा : १०५०
दहावीतील एकूण विद्यार्थी : ५६,७४५
प्रति विद्यार्थी परीक्षा शुल्क : ४१५
परीक्षा शुल्काची एकूण रक्कम : २,३५,४९,१७५
पुढे काय होणार, विद्यार्थी संभ्रमात
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्दचा निर्णय योग्य आहे. मात्र, अकरावी, आयटीआय, तंत्रनिकेतन, आदी ठिकाणी आम्हा विद्यार्थ्यांना प्रवेश कसे मिळणार, हे शिक्षण विभागाने स्पष्ट करून आमचा संभ्रम दूर करावा.
-राजवर्धन टिपुगडे, रंकाळा टॉवर.
शिक्षण मंडळ आणि शाळा प्रशासनाने समन्वय साधून परीक्षा शुल्क परतीचा निर्णय घ्यावा. आमचे दहावीचे अंतर्गत मूल्यमापन लवकर करावे. अकरावी प्रवेशासाठी सीईटी होणार असेल, तर त्याच्या स्वरूपाची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी.
-समृद्धी शिंगाडे, बिंदू चौक.
कोरोनामुळे सर्वांचीच आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे परीक्षा रद्द झाल्याने त्यासाठी घेतलेले परीक्षा शुल्क शासनाने परत करावे. अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होणार असेल, तर हरकत नाही. सीईटीच्या तयारीसाठी पुरेसा वेळ द्यावा.
-समर्थ जाधव, कनाननगर.
शिक्षणाधिकारी म्हणतात
दहावीची परीक्षा रद्द केली आहे. त्याबाबतची माहिती शासनाने आदेशाद्वारे जाहीर केली आहे. मात्र, दहावीचे परीक्षा शुल्क परत करण्याबाबत शासनाकडून कोणतीही सूचना प्राप्त झालेली नाही. शासनाच्या सूचनेनुसार याबाबत कार्यवाही केली जाईल.
-देवीदास कुलाल, सचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभाग.
===Photopath===
160521\16kol_23_16052021_5.jpg
===Caption===
डमी (१६०५२०२१-कोल-स्टार ७२३ डमी)