‘ईएसआयसी’ रुग्णालयात एक्स-रे, दंत चिकित्सेची सुविधा मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 12:20 PM2021-12-01T12:20:36+5:302021-12-01T12:22:40+5:30
या रुग्णालयातील शंभर बेडच्या व्यवस्थेसाठी इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सध्या करण्यात येत आहे.
संतोष मिठारी
कोल्हापूर : विमाधारक कामगारांसाठी आता राज्य कामगार विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) रुग्णालयात एक्स-रे आणि दंत चिकित्सेची सुविधा मिळणार आहे. नव्या वर्षातील जानेवारीमध्ये या सुविधेची सुरुवात करण्याच्या दृष्टीने रुग्णालय व्यवस्थापनाचे काम सुरू आहे. या रुग्णालयातील शंभर बेडच्या व्यवस्थेसाठी इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सध्या करण्यात येत आहे.
येथील ताराबाई पार्क परिसरातील ईएसआयसी रुग्णालयामध्ये गेल्या तीन वर्षांपूर्वी बाह्यरुग्ण विभाग सुरू झाला. या ठिकाणी मेडिसिन, आर्थोपेडिक, ईएनटीसी आदी तज्ज्ञांद्वारे वैद्यकीय सेवा दिली जात आहे. आवश्यक औषधीही देण्यात येतात. पॅथॉलॉजीची सुविधा सुरू आहे. रोज सरासरी २५० विमाधारक कामगार आणि त्यांचे कुटुंबीय उपचारासाठी येतात. या रुग्णालयात आता एक्स-रे काढण्याची आणि दंत चिकित्सेची सुविधा पुरविली जाणार आहे. शंभर बेडच्या ईएसआयसी रुग्णालयाच्या ४० कोटींच्या कामाला गेल्या दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा असलेल्या रुग्णालयाचा आराखडा श्रम मंत्रालयास सादर झाला. त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन दिल्लीतील ठेकेदाराची नियुक्ती झाली. त्यांच्याकडून बांधकाम सुरू झाले आहे. या शंभर बेडच्या रुग्णालयात ऑपरेशन थिएटर, आयसीयू कक्षाची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे येथील वैद्यकीय सेवेची गती वाढणार आहे.
खासगी रुग्णालयांसमवेत करार
ईएसआयसी रुग्णालयाने विमाधारक कामगारांना अधिक चांगली वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांसमवेत करार केला आहे. त्यात ॲपल, साई कार्डियॉक, डी. वाय. पाटील हॉस्पिटल, स्वस्तिक, सिद्धीविनायक, कृष्णा, निरायम आदी हॉस्पिटलचा समावेश असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.
जिल्ह्यातील आकडेवारी दृष्टीक्षेपात
विमाधारक कामगारांची संख्या : दीड लाख
या कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांची संख्या : सुमारे पाच लाख
ईएसआयसी रुग्णालयातील रोजची ओपीडीची संख्या : सुमारे शंभर
विमाधारक कामगारांसाठी या रुग्णालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एक्स-रे, दंतचिकित्सा सुविधा येत्या दोन महिन्यांत सुरू करण्यात येईल. -डॉ. रवींद्र पवार, वैद्यकीय अधीक्षक, ईएसआयसी रुग्णालय
जिल्ह्यात सुमारे दीड लाख विमाधारक कामगार आहेत. उद्योजक आणि औद्योगिक संघटनांचे या रुग्णालयाला पाठबळ आहे. -मोहन पंडितराव, अध्यक्ष, गोशिमा