महाडिकांकडे जाणारे ठराव झेरॉक्स कॉपी, मंत्री मुश्रीफ यांचा चिमटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 11:41 AM2020-01-17T11:41:17+5:302020-01-17T11:43:08+5:30
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘महाडिकांकडे जाणारे हे ठराव झेरॉक्स कॉपी आहेत’, असा चिमटा काढला. मागीलवेळी मी एकाकी लढत होतो, सत्ता थोड्या मतांनी हुकली, आता मुश्रीफ माझ्यासोबत आहेत, तेव्हा ‘गोकुळ’चे मैदान नक्कीच मारू, असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर : भाजपकडून ४00 ठराव आल्याची केलेली वल्गना ही अतिशयोक्तीच आहे. मागीलवेळीही सत्ताधाऱ्यांकडेच सर्वाधिक ठराव होते; पण मते किती पडली, याची आठवण करून देत पालकमंत्री सतेज पाटील यांनी कितीही गठ्ठ्याने ठराव जाऊ देत, असे सांगताच मध्येच ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘महाडिकांकडे जाणारे हे ठराव झेरॉक्स कॉपी आहेत’, असा चिमटा काढला. मागीलवेळी मी एकाकी लढत होतो, सत्ता थोड्या मतांनी हुकली, आता मुश्रीफ माझ्यासोबत आहेत, तेव्हा ‘गोकुळ’चे मैदान नक्कीच मारू, असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील हे कोल्हापूर दौऱ्यावर होते. शासकीय विश्रामगृहावर विविध विभागांच्या आढावा बैठका घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी या दोघांनी एकत्रित संवाद साधला.
‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीत भाजपची ताकद महाडिकांच्यामागे राहणार असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मंत्री पाटील यांनी वरील स्पष्टीकरण दिले.
ते म्हणाले, ‘मोठे बोलणे, अतिशयोक्तीपूर्ण बोलणे, ही काहींची सवयच झाली आहे. त्यातून भाजपकडे ४00 ठराव असल्याचे म्हटले गेले आहे. कुणाकडे किती ठराव आहेत, यावर काही ठरत नसते. मागीलवेळच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी त्याचा अनुभव घेतला आहे. सर्वाधिक ठराव त्यांच्या बाजूने असतानाही त्यांना विजयासाठी झुंजावे लागले.
थोड्या मतांनी आमचा पराभव झाला; पण आम्ही ‘गोकुळ’ हा सभासदांच्या मालकीचा राहावा; यासाठी संघर्ष कायम ठेवला आहे. आताही तीच भूमिका आहे. मागीलवेळी मी एकाकी लढत दिली होती.
आता मुश्रीफ आमच्यासोबत असल्याने संघर्ष अधिक तीव्र होईल. त्यांनी कितीही ठराव गोळा करू देत, भले एकगठ्ठा करू देत, काही फरक पडत नाही. मल्टिस्टेट ठरावावेळी काय घडले होते, हे सत्ताधाऱ्यांनी विसरू नये, असा सल्लाही मंत्री पाटील यांनी दिला.