‘झेरॉक्स’मुळे प्रकाशन संस्थांना लाखोंचा फटका

By Admin | Published: November 18, 2014 09:34 PM2014-11-18T21:34:21+5:302014-11-18T23:23:00+5:30

पन्नास टक्के बचत : अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या परिसरात झेरॉक्सचा धंदा जोरात

'Xerox' releases millions of publications | ‘झेरॉक्स’मुळे प्रकाशन संस्थांना लाखोंचा फटका

‘झेरॉक्स’मुळे प्रकाशन संस्थांना लाखोंचा फटका

googlenewsNext

राजाराम पाटील - इचलकरंजी -शहर व परिसरात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची महाविद्यालये असलेल्या भागात अभ्यासक्रमांच्या पुस्तकांची झेरॉक्स प्रत काढण्याचा व्यवसाय बोकाळला असून, त्याचा फटका पुस्तक प्रकाशन संस्थांना बसत आहे. पुणे येथील एका प्रकाशन संस्थेने इचलकरंजीतील एका झेरॉक्स दुकानावर कारवाई केल्याने बेकायदेशीर पुस्तक विक्रीचा धंदा उजेडात आला आहे. या अवैध धंद्यातून प्रकाशन संस्थांना लाखो रुपयांचा फटका बसला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरातील राजवाडा चौक व जय सांगली नाका येथे अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. तसेच या परिसरात अन्य विद्यालये व महाविद्यालये आहेत. अशा महाविद्यालयांकडील अभ्यासक्रमांच्या व संदर्भासाठी असलेल्या पुस्तकांच्या किमती ४००-५०० रुपयांपासून ते १०००-१२०० रुपये इतक्या आहेत.
या पुस्तकांची झेरॉक्स प्रत तयार करून तिला स्पायरल बायडिंग करून घेतल्यास हिच पुस्तके अवघ्या ४० ते ५० टक्के खर्चात तयार होतात. अशा पुस्तकांना चांगली मागणी आहे. त्यामुळे महाविद्यालये परिसरात असलेल्या झेरॉक्स सेंटरकडून अशी पुस्तके तयार करून देण्याचा धंदा तेजीत आला आहे.
अभ्यासक्रमांच्या पुस्तकांबरोबर संदर्भासाठीची पुस्तके, मार्गदर्शक असलेल्या नोटस्, सरावासाठी लागणारी प्रश्नपत्रिका संच, आदींच्याही झेरॉक्स प्रती मोठ्या प्रमाणात काढल्या जात आहेत.
झेरॉक्स प्रतीमुळे इकडे झेरॉक्स सेंटरचा धंदा कमालीचा नफ्यात आला असला तरी अभ्यासक्रम, संदर्भासाठी किंवा मार्गदर्शक (गाईड) पुस्तकांचे उत्पादन करणाऱ्या संस्थांना
मात्र लाखो रुपयांचा फटका बसला आहे.
राजवाडा चौक परिसरात झेरॉक्स प्रती काढणाऱ्या दुकानांची संख्या चाळीस आहे. शहराच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या या दुकानांच्या चालकांनी दुकानाच्या जागांसाठी लाखभर रुपयांची पागडी दिली आहे. यावरून झेरॉक्स सेंटरना मिळणारी मिळकत लक्षात येते.

पुस्तकाची प्रत संगणकावर ‘सेव्ह’
पुणे येथील ‘टेकमॅक्स’ कंपनी ही अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची पुस्तके प्रकाशन करणारी संस्था आहे. इचलकरंजीतील त्यांच्या पुस्तकांचा खप एकदमच कमी आल्याबद्दल त्यांनी चौकशी केली असता झेरॉक्स प्रतींचा उद्योग त्यांच्या लक्षात आला. त्यावरून त्यांनी पोलिसांत तक्रार केली आणि पोलिसांनी झेंडा चौकातील एका झेरॉक्स सेंटरवर कारवाई केली. झेरॉक्स सेंटरकडे अभ्यासक्रमाच्या पुस्तकाची प्रत संगणकावर ‘सेव्ह’ करून ठेवली होती. मागणीनुसार त्याच्या झेरॉक्स प्रतींचे पुस्तक तयार करून दिले जाते, असे पोलीस कारवाईत उघड झाले.

Web Title: 'Xerox' releases millions of publications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.