कोल्हापुरात ७४ वर्षीय उद्योगपती देताहेत बारावीची परीक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 11:37 AM2020-02-18T11:37:17+5:302020-02-18T11:39:06+5:30
कोल्हापूरातील बारावीच्या एका परीक्षा केंद्रावर ७४ वर्षीय एक उद्योगपतीही आपल्या सुनेसोबत आले होते, अनेकांना वाटेल की सुनबाई परिक्षेला बसल्यामुळे तिला सोडण्यासाठी ते आले असतील, परंतु प्रत्यक्षात सुनबाईच आपल्या सासऱ्यांसोबत परिक्षा केंद्रावर आली होती कारण, हे वृद्ध उद्योगपतीच बारावीची परीक्षा देण्यासाठी आले होते.
कोल्हापूर : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेला आज, मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. कोल्हापूरातील बारावीच्या एका परिक्षा केंद्रावर ७४ वर्षीय एक उद्योगपतीही आपल्या सुनेसोबत आले होते, अनेकांना वाटेल की सुनबाई परिक्षेला बसल्यामुळे तिला सोडण्यासाठी ते आले असतील, परंतु प्रत्यक्षात सुनबाईच आपल्या सासऱ्यांसोबत परिक्षा केंद्रावर आली होती कारण, हे वृध्द उद्योगपतीच बारावीची परिक्षा देण्यासाठी आले होते. नापास झाल्यामुळे न खचता वार्धक्यातही परिक्षा देण्याची जिद्द बाळगणाऱ्या देशिंगे यांनी परिक्षेत नापास झाल्याने आत्महत्या करणाऱ्या विद्यार्र्थ्यासमोर आदर्श ठेवला आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यात दहावी आणि बारावीच्या परिक्षांना मोठे महत्व आहे. अनेक पालक आपल्या पाल्यांना घेउन संबंधित परिक्षा केंद्रांवर आले होते. गोखले कॉलेज येथील परिक्षा केंद्रावरही अनेक पालक आपल्या पाल्यांना घेउन आले होते. तेथे लक्ष्मीपुरी येथील रहिवाशी रविंद्र बापू देशिंगे हे ७४ वर्षीय उद्योगपतीही परिक्षा केंद्रावर आले होते. सोबत त्यांच्या सूनबाई होत्या.
प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आणि कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे संचालक नगरसेवक तौफिक मुल्लाणी हेही त्यांची कन्या कुलसूमसोबत या केंद्रावर आले होते, त्यांना उत्सुकता वाटली म्हणून चौकशी केली, तेव्हा देशिंगे हे त्यांच्या सूनबार्इंसाठी नव्हे तर ते स्वत:च बारावीची परिक्षा देण्यासाठी तेथे आले होते. देशिंंगे उत्तम उद्योगपती आहेत. गेल्या वर्षीही त्यांनी बारावीची परिक्षा दिली होती, परंतु तीन विषय राहिल्याने ते या वयातही पुन्हा जिद्दीने पदवी मिळवण्यासाठी कशाचीही तमा न बाळगता परीक्षेस बसले आहेत. मुल्लाणी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
किरकोळ कारणावरुन आत्महत्या करणाऱ्यांनी देशिंगे आजोबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. नापास झाल्याचे दु:ख न करता जिद्दीने ते बारावीची पदवी मिळविण्यासाठी परिश्रम करत आहेत, हे प्रेरणादायी आहे. आयुष्य स्थिरस्थावर झाले असतानाही पदवी मिळवायचीच या जिद्दीने ते परिक्षा देत आहेत. त्यांना साथ देणाऱ्या कुटूंबियांचेही कौतुक करावे लागेल. विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे.
तौफिक मुल्लाणी,
नगरसेवक, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव,
संचालक, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स