बारावीच्या फेरपरीक्षेत कोल्हापूर विभागात मुलींची आघाडी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 11:32 AM2018-08-25T11:32:43+5:302018-08-25T11:38:09+5:30
बारावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्णतेमध्ये कोल्हापूर विभागात यावर्षीही मुलींनी आघाडी कायम राखली. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा १२.२३ टक्के जादा आहे. विभागाचा एकूण निकाल २५.९४ टक्के लागला. त्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ०.७८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कोल्हापूर : बारावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्णतेमध्ये कोल्हापूर विभागात यावर्षीही मुलींनी आघाडी कायम राखली. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा १२.२३ टक्के जादा आहे. विभागाचा एकूण निकाल २५.९४ टक्के लागला. त्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ०.७८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
विभागाने राज्यात तिसरा क्रमांक मिळविला आहे. विभागामध्ये २७.४३ टक्क्यांसह कोल्हापूर जिल्हा अव्वल स्थानी आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवारी दुपारी एक वाजता आॅनलाईन निकाल जाहीर झाला.
बारावीच्या निकालाबाबतची कोल्हापूर विभागाची माहिती शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव टी. एल. मोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सचिव मोळे म्हणाले, या फेरीपरीक्षेअंतर्गत लेखी परीक्षा दि. १७ जुलै ते ४ आॅगस्टदरम्यान, तर दि. ९ जुलै ते १६ जुलै या कालावधीत प्रात्यक्षिक, तोंडी आणि श्रेणी परीक्षा झाली.
या फेरपरीक्षेसाठी कोल्हापूर विभागातून ८१२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यांपैकी ८१०८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील २१०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी २५.९४ आहे. या परीक्षेत मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण २४.०४ टक्के, तर मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ३६.२७ आहे.
मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा १२.२३ टक्क्यांनी जादा आहे. या परीक्षेच्या विभागातील शाखानिहाय निकालामध्ये ३३.८५ टक्क्यांसह विज्ञान शाखा पुढे आहे. त्यापाठोपाठ वाणिज्य (२९.०७ टक्के), व्यावसायिक (२५.३९) आणि कला (२३.८२) या शाखा आहेत. यावर्षी विभागात कॉपीचा एक प्रकार घडला. त्याबाबत मंडळाच्या नियमानुसार कारवाई करण्यात आली.
या परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाची प्रत या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गुणपत्रिका वाटपाची तारीख मंडळातर्फे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेस प्रभारी शिक्षण उपसंचालक किरण लोहार, लेखाधिकारी एस. एल. रेणके, सांगलीच्या शिक्षणविस्तार अधिकारी एस. एस. बस्तवडे, साताऱ्याचे शिक्षणविस्तार अधिकारी साईनाथ वालेकर उपस्थित होते.
जिल्हा निकाल असा
- कोल्हापूर : २७.४३ टक्के
- सांगली : २६.६२ टक्के
- सातारा : २३.४९ टक्के
विभागातील आकडेवारी दृष्टिक्षेपात
- कोल्हापूर विभागाचा एकूण निकाल : २५.९४ टक्के
- निकालातील या वर्षीची वाढ : ०.७८ टक्के
- एकूण उत्तीर्ण विद्यार्थी : २१०३
- उत्तीर्ण मुलांची संख्या : १६४६
- उत्तीर्ण मुलींची संख्या ४५७
विद्यार्थ्यांसाठी हे महत्त्वाचे
- उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीच्या मागणी मुदत : दि. २७ आॅगस्ट ते १५ सप्टेंबर
- गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत : दि. २७ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर