सहा वर्षे यड्रावचा बाजारकट्टा विक्रेत्यांच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:30 AM2021-02-25T04:30:08+5:302021-02-25T04:30:08+5:30

घन:शाम कुंभार, लोकमत न्यूज नेटवर्क यड्राव : यड्राव (ता. शिरोळ) येथील आठवडा बाजारामुळे हातकणंगले व शिरोळ तालुक्यात वाहतुकीची कोंडी ...

Yadrav's market has been waiting for vendors for six years | सहा वर्षे यड्रावचा बाजारकट्टा विक्रेत्यांच्या प्रतीक्षेत

सहा वर्षे यड्रावचा बाजारकट्टा विक्रेत्यांच्या प्रतीक्षेत

Next

घन:शाम कुंभार,

लोकमत न्यूज नेटवर्क

यड्राव : यड्राव (ता. शिरोळ) येथील आठवडा बाजारामुळे हातकणंगले व शिरोळ तालुक्यात वाहतुकीची कोंडी होत आहे. बाजार कट्टा असतानाही बाजार रस्त्यावरच भरत असल्याने वाहनचालकांबरोबरच नागरिकांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

इचलकरंजीसह हातकणंगले तालुक्यातून येणाऱ्यांना यड्राव हे शिरोळ तालुक्याचे प्रवेशद्वार आहे. प्रत्येक मंगळवारी येथे बाजार भरतो. या मार्गावरून इचलकरंजीकडे विविध कारणासाठी ये-जा करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. यामुळे हा चौक कायमच रहदारीने गजबजलेला असतो.

येथील बाजार गावात जाणाऱ्या प्रमुख मार्गावर दुतर्फा भरत असून, भाजीपाला, बेकरी उत्पादने, कपडे, प्लास्टिक साहित्य, मसाले साहित्य, फळे यासह घरगुती वापराची साधने विक्रीसाठी येत असल्याने नेहमी गर्दी होते. त्यातच हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील पाच साखर कारखान्यांची ऊस वाहतूक तसेच जैन धर्मियांचे पुरातन तीर्थक्षेत्र नांदणी मठ व श्री दत्तक्षेत्र नृसिंहवाडीकडे जाण्यासाठी हाच मार्ग असल्याने बाजारामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. विस्तारित भागात असलेल्या बाजार कट्ट्यावर विक्रेते येत नसल्याने सहा वर्षांपासून हा कट्टा बाजाराच्या प्रतीक्षेत आहे.

बाजाराला येणाऱ्या ग्राहकांना आपली वाहने रस्त्यावर लावूनच खरेदीसाठी बाजारात जावे लागते. त्यामुळे मुख्य मार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मुख्य चौकातून पार्वती औद्योगिक वसाहतीकडे मालवाहतूक होत असल्याने त्यालाही अडचण निर्माण होते.

हा होऊ शकतो पर्याय -

यड्रावच्या विस्तारित भागातील रेणुका नगरमध्ये ग्रामपंचायतीने कृषी पणन विभागाकडून आठवडा बाजार कट्टा योजनेंतर्गत हा बाजार कट्टा २०१३ला बांधला आहे. बाजार कट्टा बांधून सहा वर्षे होऊन गेली तरी त्याठिकाणी फक्त दोन ते तीनवेळा बाजार भरला. बाजार कट्ट्यावर विक्रेत्यांना प्रतिसाद मिळाला नसल्याने ते गावामध्येच विक्रीसाठी बसतात. गावभागातील लोकांना बाजार कट्टा लांब वाटत असला, तरी ग्रामपंचायतीने सक्ती केल्यास मुख्य मार्गावरील ताण कमी होऊ शकतो. (उद्याच्या अंकात राधानगरी बाजार)

कोट -

बाजार कट्ट्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील खोतवाडीचा बाजार सोमवारी भरतो. यामुळे लगेच मंगळवारी कट्टयावर बाजार भरल्यास विक्रेत्यांना फायदा होत नाही. यामुळे विक्रेत्यांच्या मागणीप्रमाणे गावातच बाजार भरविण्यात येतो.

- सरदार सुतार (माजी सरपंच)

फोटो ओळ -

यड्राव (ता. शिरोळ ) येथील चौकात बसथांब्याजवळ आठवडा बाजार भरत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. दुसरीकडे बाजार कट्टा विक्रेत्यांच्या प्रतीक्षेत आहे. (२४०२२०२१-कोल-यड्राव)

Web Title: Yadrav's market has been waiting for vendors for six years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.