स्वातंत्र्यदिनापासून पूरग्रस्त गावांचा यल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:27 AM2021-08-13T04:27:53+5:302021-08-13T04:27:53+5:30

कोल्हापूर : पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासह महापुराला कारणीभूत घटकांबाबत शासनस्तरावर तातडीने पावले उचलावीत, या मागणीसाठी जिल्ह्यातील पूरग्रस्त एकवटले आहेत. स्वातंत्र्यदिनी ...

Yalgar of flood-hit villages since Independence Day | स्वातंत्र्यदिनापासून पूरग्रस्त गावांचा यल्गार

स्वातंत्र्यदिनापासून पूरग्रस्त गावांचा यल्गार

Next

कोल्हापूर : पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासह महापुराला कारणीभूत घटकांबाबत शासनस्तरावर तातडीने पावले उचलावीत, या मागणीसाठी जिल्ह्यातील पूरग्रस्त एकवटले आहेत. स्वातंत्र्यदिनी रविवारी झेंडावंदनानंतर भरणाऱ्या ग्रामसभेत जिल्हा व गावनिहाय पूरग्रस्त समित्या स्थापन करुन लढ्याचे रणशिंग फुंकले जाईल, असा निर्णय गुरुवारी कोल्हापुरात पूरग्रस्त समितींतर्गत भरलेल्या सरपंच मेळाव्यात झाला. सरकारने लक्ष दिले तर ठीक अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलनाचा मार्गही मोकळा ठेवण्याचा निर्धार करण्यात आला.

महापुरामुळे शेती, व्यवसाय, प्रपंचाचे मोठे नुकसान होत आहे. येथून पुढे हे संकट दरवर्षी येण्याची शक्यता असल्याने त्यापासून वाचण्यासाठी म्हणून काॅंग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी पक्षविरहीत पूरग्रस्त समिती स्थापनेसाठी पुढाकार घेतला आहे. पुराचा मोठा फटका बसलेल्या १५०हून अधिक गावांतील सरपंचांना एकत्र बोलावून त्यांच्याच अध्यक्षतेखाली गुरुवारी दसरा चौकातील शहाजी कॉलेजमध्ये पहिली बैठक झाली. या बैठकीत ६०हून अधिक सरंपच व त्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी झेंडावंदन झाल्यानंतर सरपंचांनी पुढाकार घेऊन सर्वानुमते पूरग्रस्त गावनिहाय समिती स्थापन करण्याचे ठरले. जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय एक समिती स्थापन करावी आणि त्यानंतर जिल्ह्यातील एकत्रित पूरग्रस्त समिती काम करेल. पुराचा फटका बसलेल्या ग्रामीण जनतेबरोबरच शहरातील नागरिकांनीही प्रभागनिहाय समिती स्थापन करुन संलग्न राहिल्यास त्यांचेही प्रश्न सोडविण्यास पुढाकार घेऊ, अशी ग्वाही बाजीराव खाडे यांनी दिली.

या सरपंच मेळाव्यातील चर्चेत सचिन चौगले (वडणगे), राजू मगदूम (माणगाव), एस. आर. पाटील (चिखली), प्रकाश रोटे (शिंगणापूर), भिकाजी पाटील (पाडळी बुद्रुक), सज्जन पाटील (महे), सदाशिव खाडे (सांगरुळ), संदीप पाटील (पाटपन्हाळा), शोभा पाटील (वाळोली), वसंत तोडकर (वाकरे), सिकंदर मुजावर (आंबेवाडी), सागर पाटील (देवाळे), सर्जेराव तिबिले (बीड), शंकरराव शिंदे (वाठार), सचिन पाटील (पाटेकरवाडी), सुदर्शन उपाध्ये (चिंचवाड) यांनी भाग घेतला.

चौकट

सरपंच म्हणतात, सांगा कसं जगायचं?

रहिवास क्षेत्रात पाणी येत असल्याने पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पण पुनर्वसन कुठे आणि कसे करणार, हा मोठा प्रश्न आहे. सरकारने जागा दिली तरी घर बांधण्याइतपत आर्थिक कुवत राहिलेली नाही. पिकाऊ शेती पाण्याखाली जात असल्याने त्यावर केलेला खर्च आणि येणारे उत्पन्नही पाण्यात जात असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असल्याने सांगा कसं जगायचं, असा प्रश्न सरपंचांनी बैठकीत केला.

चौकट

सप्टेंबरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार

महापुराला राष्ट्रीय, राज्य मार्गासह नदी, नाल्यांवरील पुलांचे भराव कारणीभूत असल्याने ते हटविण्यासाठी जलसंपदा व सार्वजनिक विभागाने सविस्तर अभ्यास अहवाल द्यावा. हा आलेला अहवाल जनतेसमोर मांडून पुढील उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी पूरग्रस्त समितीने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचे ठरले.

फोटो: १२०८२०२१-कोल-पूरग्रस्त समिती ०१

फोटो ओळ : कोल्हापुरात गुरुवारी दुपारी पूरग्रस्त समितीने सरपंच मेळावा घेऊन महापुरानंतरच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

फोटो: १२०८२०२१-कोल-पूरग्रस्त समिती ०२

फोटो ओळ : कोल्हापुरात गुरुवारी दुपारी पूरग्रस्त समितीने घेतलेल्या सरपंच मेळाव्यात काॅंग्रेसचे नेते बाजीराव खाडे यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Yalgar of flood-hit villages since Independence Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.