यमगर्णी पूरग्रस्तांचा सर्व्हे पारदर्शक व्हावा : नितीन नेपिरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:24 AM2021-07-27T04:24:24+5:302021-07-27T04:24:24+5:30
यावर्षी आलेल्या महापुराने यमगर्णी येथील असंख्य नागरिकांचे नुकसान झाले आहे. सध्या प्रशासनाकडून सुरू असलेल्या सर्व्हेमध्ये २०८ कुटुंब पूरग्रस्त म्हणून ...
यावर्षी आलेल्या महापुराने यमगर्णी येथील असंख्य नागरिकांचे नुकसान झाले आहे. सध्या प्रशासनाकडून सुरू असलेल्या सर्व्हेमध्ये २०८ कुटुंब पूरग्रस्त म्हणून नोंद झाले आहेत, पण ही संख्या अजून वाढणार असून हा सर्व्हे पारदर्शक, निष्पक्षपाती व्हावा व जेवढे पूरग्रस्त आहेत त्या सर्व नागरिकांचे यमगर्णी हद्दीतील गायरान सर्व्हे नंबर ५४ मध्ये पुनर्वसन करावे, अशी मागणी यमगर्णी पीकेपीएसचे अध्यक्ष नितीन नेपिरे यांनी केली.
प्राथमिक कृषी पतिन संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी अध्यक्ष प्रभाकर पोकले यांची प्रमुख उपस्थिती होती.
ते पुढे म्हणाले की, २०१९ पेक्षा २०२१ च्या महापुराची तीव्रता अधिक असून यामध्ये पूरग्रस्तांची संख्या अधिक आहे. या सर्व पूरग्रस्तांचा सर्व्हे निष्पक्षपणाने व भेदभावविरहित होणे गरजेचे आहे. या पुरात अनेक नागरिकांची घरे पडली आहेत. पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्व्हे प्रामाणिकपणे होणे गरजेचे आहे. जोपर्यंत पूरग्रस्तांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
शरद पाटील म्हणाले की, २०१९ साली आलेल्या महापुरानंतर पूरग्रस्तांचा सर्व्हे करण्यात आला होता, पण या सर्व्हेमध्ये फेरफार करण्यात आला असून खऱ्या पूरग्रस्तांना मदत मिळाली नाही. त्यामुळे यावेळी पारदर्शकपणे सर्व्हे व्हायला पाहिजे व सर्वांना मदत मिळाली पाहिजे.
यावेळी ग्रा. पं. सदस्य प्रवीण मोरे, संतोष पाटील, काका कांबळे, रियाज खान इनामदार, प्रशांत पोकले, अशोक पोवार यांच्यासह पूरग्रस्त उपस्थित होते.