सूत दरात १० ते १५ रुपये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2017 12:04 AM2017-02-12T00:04:40+5:302017-02-12T00:04:40+5:30
कापडास भाव नाही : यंत्रमागधारकांसह व्यापारी वर्ग हवालदिल
इचलकरंजी : कापड उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या सुताच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्यामुळे येथील वस्त्रोद्योगात खळबळ उडाली आहे. आठवडाभरात विविध प्रकारच्या सूत दरात किलोला १० ते १५ रुपये इतकी वाढ झाली असून, त्या प्रमाणात कापडास भाव मिळत नसल्याने यंत्रमागधारक व व्यापारी हवालदिल झाले आहेत.
वस्त्रोद्योगात असलेली आर्थिक मंदी आणि त्यापाठोपाठ आलेली नोटाबंदी यामुळे कापड उत्पादक यंत्रमागधारक व व्यापारी अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. या पार्श्वभूमीवर कापडाच्या भावात थोडी वाढ होत असतानाच गेल्या दीड महिन्यापासून सातत्याने सुताच्या दरामध्येसुद्धा वाढ होऊ लागली आहे. विशेषत: ६० वेफ्ट या प्रकाराच्या सुतामध्ये प्रतिकिलो ५० ते ६० रुपयांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर ३०, ३४, ४०, ४२, ६४, ८०, १०० व १२० या सुतामध्येसुद्धा प्रतिकिलो २५ ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. सुतापासून उत्पादित कापडाच्या दरात मात्र प्रतिमीटर फक्त १ रुपये ५० पैसे ते १ रुपये ७५ पैसे इतकीच वाढ झाली आहे. परिणामी, यंत्रमागधारकांना नुकसान होत असल्याने सूत दरवाढीच्या विरोधात असंतोष पसरला आहे.
सूत दरवाढीबाबत बोलताना इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी व यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, कापडाचे भाव थोडे जरी वाढले तरी सूत व्यापारी व दलालांकडून त्याचा गैरफायदा घेत सुताचे दर वाढविले जात आहेत. यामध्ये सरकारने हस्तक्षेप करून सूत दरावर नियंत्रण आणले पाहिजे. ज्यामुळे यंत्रमागावर तयार होणाऱ्या कापडास कापड उत्पादक यंत्रमागधारक व व्यापाऱ्यांना अल्प नफा मिळावा, अशी तरतूद सरकारने करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)
६० वेफ्ट या प्रकाराच्या सुतामध्ये प्रतिकिलो ५० ते ६० रुपयांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर ३०, ३४, ४०, ४२, ६४, ८०, १०० व १२० या सुतामध्येसुद्धा प्रतिकिलो २५ ते ३० रुपयांची वाढ झाली आहे.