सूत व्यापाऱ्यांनी पेमेंटवरील व्याजदर कमी करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:16 AM2021-06-11T04:16:34+5:302021-06-11T04:16:34+5:30
इचलकरंजी : गेल्या अनेक वर्षांपासून यंत्रमाग व्यवसाय अडचणीतून मार्गक्रमण करत आहे. याचा विचार करून सूत व्यापाऱ्यांनी पेमेंटवरील व्याजदर आकारणी ...
इचलकरंजी : गेल्या अनेक वर्षांपासून यंत्रमाग व्यवसाय अडचणीतून मार्गक्रमण करत आहे. याचा विचार करून सूत व्यापाऱ्यांनी पेमेंटवरील व्याजदर आकारणी कमी करावी. तसेच ३० दिवसांनंतर पेमेंट करणाऱ्यांना बँकेच्या व्याजदराप्रमाणेच व्याज आकारणी करावी, अशी मागणी यंत्रमागधारक जागृती संघटनेच्यावतीने इचलकरंजी यार्न मर्चंटस् असोसिएशनकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शहरात सन २०१९ साली आलेला महापूर व सलग दोन वर्षे कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा यंत्रमागधारकांना मोठा सामना करावा लागत आहे. व्यवसायाचे चक्र थांबले, तर पुन्हा व्यवसाय चालू करणे जिकिरीचे होणार आहे. शहरातील प्रत्येक यंत्रमागधारक सर्व व्यापाऱ्यांची प्रामाणिकपणे देणी भागवत आहे. शहरामध्ये ३० दिवस कालावधीच्या दराने सूत खरेदी करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. लॉकडाऊनमुळे विक्री केलेल्या कापडाचे पेमेंट लांबणीवर गेल्याने सुताचे पेमेंट करताना यंत्रमागधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सुताचे पेमेंट ३० दिवसांत न झाल्यास सूत व्यापाऱ्यांकडून बिलावर १५ टक्के, १८ टक्के व २९ टक्के अशा चढ्या दराने व्याज आकारणी केली जाते. ती बँकेच्या व्याजदराप्रमाणेच व्याज आकारणी करावी, असे अध्यक्ष विनय महाजन व उपाध्यक्ष सूरज दुबे यांनी म्हटले आहे.