युपीएससीतील यशवंत बनले नव्या पिढीचे आयडॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 04:41 PM2020-08-11T16:41:38+5:302020-08-11T16:43:10+5:30

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेत कोल्हापुरातील मुलांना यश मिळत गेले. ही मुले नव्या पिढीची आयडॉल बनली. त्यामुळे युपीएससीसह राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकडे मुलांचा ओघ वाढला व त्यामध्ये यशस्वी होण्याचे प्रमाणही वाढल्याचे सकारात्मक चित्र कोल्हापुरात दिसत आहे.

Yashwant became the new generation idol in UPSC | युपीएससीतील यशवंत बनले नव्या पिढीचे आयडॉल

युपीएससीतील यशवंत बनले नव्या पिढीचे आयडॉल

Next
ठळक मुद्देयुपीएससीतील यशवंत बनले नव्या पिढीचे आयडॉलयांनीही फडकवला कोल्हापूरचा झेंडा

विश्वास पाटील

कोल्हापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेत कोल्हापुरातील मुलांना यश मिळत गेले. ही मुले नव्या पिढीची आयडॉल बनली. त्यामुळे युपीएससीसह राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकडे मुलांचा ओघ वाढला व त्यामध्ये यशस्वी होण्याचे प्रमाणही वाढल्याचे सकारात्मक चित्र कोल्हापुरात दिसत आहे.

म्हणजे युपीएससीमधील यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे यश त्यांच्या आयुष्याला मोठेपण देऊन गेलेच परंतु त्यातून विविध स्पर्धा परीक्षांमध्येकोल्हापूरलाही पुढे नेण्याचे काम त्यातून झाले आहे. माझे कोल्हापूर फक्त तांबड्या-पांढरा रस्सा व मिशीला पिळ देण्यापुरतेच मर्यादित राहिलेले नाही ते स्पर्धेच्या क्षेत्रातही पुढे राहिले आहे.

ज्ञानेश्वर मुळे, भूषण गगरानी, विकास खारगे, शोभा मधाळे, सतीश जाधव, कृष्णात पाटील अशी अनेक नावे सांगता येतील की सामान्य कुटुंबातून पुढे येऊन फक्त आणि फक्त जिद्द आणि कष्टाच्या बळावर त्यांनी उत्तुंग यशाला गवसणी घातली आहे. त्या काळात फारसे मार्गदर्शक मिळत नव्हते.

मुळात मुलांचेच प्रमाण कमी असताना मुली या परीक्षेला बसणे म्हणजे फारच दुर्मीळ होते अशा काळात सम्राटनगरातील शोभा मधाळे यांनी मिळविलेले यश तर दीपस्तंभाप्रमाणे आहे. मुलींमध्ये या परीक्षेत यशस्वी झालेल्या त्या पहिल्या आहेत. त्यांचे शिक्षण प्रायव्हेट हायस्कूल व न्यू कॉलेजमध्ये झाले.

हुपरीच्या रयत शिक्षण संस्थेच्या कॉलेजमध्ये त्या दोन वर्षे प्राध्यापक होत्या. त्यानंतर एकाचवेळी केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या व सप्टेंबर १९९४ मध्ये त्या इंडियन पोस्टल सर्व्हिसमध्ये रूजू झाल्या. आता त्या नवी मुंबई रिजनच्या पोस्टमास्टर जनरल आहेत. देशातील अनेक राज्यांत काम करून महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सक्षमपणे सांभाळल्या आहेत. खरेतर युपीएससीच्या परीक्षेत आतापर्यंत जे यशस्वी झाले आहेत त्यांचे जीवन म्हणजे एक प्रेरणेचा, उर्जेचा मोठा स्रोतच आहे. त्यातील ठिणगी घेऊन त्यांच्यापुढच्या काळात अनेकांनी आपल्या आयुष्यात यशाचे दीप प्रज्वलित केले आहेत.

फारसे आर्थिक पाठबळ नाही. कुटुंबात शिक्षणाची फारशी परंपरा नाही. अमूक वाटेने जा, म्हणून सांगणारे कोण नाही..अशा वातावरणांत या सर्वांनी हे उत्तुंग यश मिळविले आहे. अब्दुललाट, कोकरूड, वडणगे, प्रयाग चिखली, सरूड, आवळी खुर्द अशा गावांतून ही मुले-मुली आली आहेत. कृष्णात जाधव यांच्यासारखा अधिकारी तर शेळेवाडीतून लाल एस.टी.तून कोल्हापूरला येऊन शिकले आणि यशस्वी झाले.

या सर्वांनी घालून दिलेल्या यशाच्या वाटेवरून आता कोल्हापूरची नवी पिढी जात आहे त्यामुळे केंद्रीय लोकसेवा असो की राज्य लोकसेवा असो त्यामधील कोल्हापूरचा नंबर वाढू लागला आहे हे मात्र नक्की.


मूळचे कोकरूडचे परंतु ज्यांचे सर्व शिक्षण कोल्हापुरात झाले असे सध्याचे नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील हे १९९४ ला आयपीएस झाले. त्यांची जडणघडण शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये झाली. त्यांची जीवनगाथा वाचून, ऐकून शेकडो मुलांनी प्रेरणा घेतली. अनेक फौजदार आणि पोलीस उपअधीक्षक ह्यमन में है विश्वासह्ण हे त्यांचे आत्मचरित्र वाचून त्यातून घडले.

यांनीही फडकवला कोल्हापूरचा झेंडा..

  • शोभा मधाळे : पोस्टमास्टर जनरल नवी मुंबई रिजन
  • सचिन भानुशाली-आयआरएस
  • नरेंद्र कुलकर्णी-आयआरएस
  • महेश यशवंत पाटील-डेप्युटी कमिशनर जीएसटी व कस्टम
  • राहुल रघुनाथ पाटील-आयआरएएस
  • अनिरुद्ध कुलकर्णी-जॉईंट कमिशनर जीएसटी व कस्टम
     

जीवनात यशस्वी..

सागर पिलारेसारखे काहीजण या परीक्षेत भले यशस्वी झाले नाहीत परंतु तरी ते ज्या क्षेत्रात गेले तिथे त्यांनी उत्तम यश मिळविले आहे. जीवनात यशस्वी व्हायला त्यांना या परीक्षेतील अभ्यासाचा पाया उपयुक्त ठरला आहे.

हे व्हायला हवे..

शिवाजी विद्यापीठापासून प्री आयएएस ट्रेनिंग सेंटरपर्यंत कोल्हापुरात या परीक्षांमध्ये प्रत्येक वर्षी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची एकत्रित लिस्ट कुणीच तयार केलेली नाही. प्री आयएएस सेंटरकडे १९९२ पासून २०१९ पर्यंतची नावे आहेत परंतु या केंद्राकडे फक्त कोल्हापुरातीलच नव्हे तर राज्यभरांतून विद्यार्थी येतात त्यांचीही ही लिस्ट आहे. जे विद्यार्थी या केंद्राकडे येत नाही परंतु मूळचे कोल्हापूरचे असून जे पुणे, मुंबई व दिल्लीत जावून या परीक्षांची तयारी करतात व यशस्वी होतात त्यांची एकत्रित लिस्ट कुठेच नाही.

लोकमतने २७ जणांची लिस्ट वापरली असली तरी ही संख्या त्याहून जास्त आहे. त्यांची नांव, सध्याचे पोस्टिंगसह संपर्क नंबर असे एकत्रित लिस्ट केल्यास कोल्हापूरचे विद्यार्थी देशात कोणकोणत्या पदावर काम करतात व त्यांचा कोल्हापूरच्या विकासासाठीही उपयोग करून घेता येऊ शकतो.

 

Web Title: Yashwant became the new generation idol in UPSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.