यशवंत भालकर यांचा मनाला चटका लावणारा मृत्यू : जिंदादिल माणूस हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 05:38 PM2018-12-19T17:38:56+5:302018-12-19T17:41:04+5:30

ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या गेल्या दोन-तीन दिवसांपासून छातीत दुखत होते. बुधवारी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये जाऊन ते तपासणी करून घेणार होते; परंतु तेवढाही धीर मृत्यूने धरला नाही. त्याआधीच नियतीने त्यांचे ‘पॅकअप’ केले. त्यांचा अचानक मृत्यू मनाला चटका लावून गेला. एक जिंदादिल माणूस हरपल्याची भावना समाजमनांतून व्यक्त झाली.

Yashwant Bhalkar's heart attack: Death | यशवंत भालकर यांचा मनाला चटका लावणारा मृत्यू : जिंदादिल माणूस हरपला

यशवंत भालकर यांचा मनाला चटका लावणारा मृत्यू : जिंदादिल माणूस हरपला

googlenewsNext
ठळक मुद्देयशवंत भालकर यांचा मनाला चटका लावणारा मृत्यू : जिंदादिल माणूस हरपलाडॉक्टरांच्या अ‍ॅपॉइंटमेंटआधीच मृत्यूने केले ‘पॅकअप’

विश्र्वास पाटील

कोल्हापूर : ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या गेल्या दोन-तीन दिवसांपासून छातीत दुखत होते. बुधवारी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये जाऊन ते तपासणी करून घेणार होते; परंतु तेवढाही धीर मृत्यूने धरला नाही. त्याआधीच नियतीने त्यांचे ‘पॅकअप’ केले. त्यांचा अचानक मृत्यू मनाला चटका लावून गेला. एक जिंदादिल माणूस हरपल्याची भावना समाजमनांतून व्यक्त झाली.

नेहमी हसत-खेळत असणारे, मंगळवारी (दि. १८) रात्री बारा वाजता सौंदत्ती यात्रेला निघालेल्या गल्लीतील भविकांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या भालकर यांना पहाटे मृत्यूने कवेत घेतले. त्यामुळे सकाळी जेव्हा त्यांच्या निधनाची बातमी समजली, तेव्हा अनेकांना त्याचा मोठा धक्काच बसला.

भालकर हे ज्येष्ठ दिग्दर्शक होते. त्यांचे चित्रपट क्षेत्रातील योगदान मोठे आणि मोलाचे असले तरी एक माणूस, सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही त्यांची ओळख अधिक गडद होती; म्हणूनच त्यांच्या अंत्यसंस्कारांवेळी समाजाच्या सर्वच क्षेत्रांतील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माणूस अचानक निघून जाणे म्हणजे काय असते, असेच काहीसे मरण भालकर यांना आले. त्यांची प्रकृती उत्तम होती. ते गेली अनेक वर्षे रोज सकाळी रंकाळ्यावर फिरायला जात असत. त्यांना यापूर्वी कधी हृदयविकाराचा त्रासही जाणवला नव्हता.

मात्र गेल्या चार दिवसांपूर्वी आजाराची व कदाचित मृत्यूचीही चाहूल त्यांना लागली होती. त्यांच्या एका निकटच्या स्नेह्याच्या मुलीचे लग्न ठरले होते. त्याची लग्नपत्रिका घेऊन ते भालकर यांना भेटले व लग्नाला यायचे आणि शेवटपर्यंत थांबायचे, असा आग्रह करून गेले; परंतु दुर्दैवाने त्यांचे दोन दिवसांपूर्वी आकस्मिक निधन झाले. भालकर यांच्या मनाला त्याचा चटका बसला. त्यामुळे गेले दोन दिवस ते रंकाळ्यावर त्यांच्यासोबत फिरणाऱ्यांना सर्वांशी ‘चांगले वागा, माझ्याकडून कुणी दुखावले असेल तर मला माफ करा,’ असे बोलत होते. त्यांना कदाचित मृत्यूची चाहूल लागली होती की काय, अशी शंका व्यक्त झाली.

दिग्दर्शकाइतकाच त्यांच्यातील सामाजिक कार्यकर्ता सजग व धडपडणारा होता. मंगळवार पेठेसारख्या जुन्या कोल्हापुरात त्यांची जडणघडण झाली. त्यामुळे सर्वांच्या मदतीला धावून जाण्याची त्यांची वृत्ती होती. अलीकडील काही वर्षांत त्यांचा रंकाळ्यावर फारच जीव जडला होता. तिथे काही चुकीचे झालेले त्यांना अजिबात आवडायचे नाही. रंकाळ्याची पर्यावरण समृद्धी जोपासण्याची त्यांची धडपड होती. स्वत: लावलेल्या झाडांच्या सान्निध्यातच त्यांनी परवा एकसष्टी साजरी केली होती.
 

 

Web Title: Yashwant Bhalkar's heart attack: Death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.