यशवंतराव चव्हाण महान होऊनही विनम्र
By admin | Published: March 15, 2017 01:01 AM2017-03-15T01:01:20+5:302017-03-15T01:01:20+5:30
विजय कुवळेकर : शिवाजी विद्यापीठात ‘ग्रंथांनी रचलेला महापुरुष : यशवंतराव चव्हाण’ ग्रंथाचे प्रकाशन
कोल्हापूर : सातत्यपूर्ण वाचनामुळेच यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिपादनात कधीही पुनरावृत्ती आढळत नाही. महान होऊनही विनम्र असण्याचे, संयत पद्धतीने व्यक्त होण्याचे मूळही त्यातच आढळते. वाचनानेच यशवंतरावांसारखा निष्कलंक चारित्र्याचा पारदर्शक आणि निखळ माणूस घडला, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांनी मंगळवारी येथे केले.
शिवाजी विद्यापीठातील यशवंतराव चव्हाण अध्यासन आणि आनंद ग्रंथसागर प्रकाशनातर्फे आयोजित डॉ. आनंद पाटील लिखित ‘ग्रंथांनी रचलेला महापुरुष : यशवंतराव चव्हाण’ या ग्रंथाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहातील कार्यक्रमास त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील हे प्रमुख उपस्थित, तर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
ज्येष्ठ पत्रकार कुवळेकर म्हणाले, सभ्यता, सुसंस्कृतता आणि अभिजातता यांचा तिहेरी संगम यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्त्वात आढळतो. त्याचे प्रतिबिंब ‘ग्रंथांनी रचलेला महापुरुष’च्या पानोपानी आढळते. ग्रंथांतून वाचलेले तत्त्वज्ञान आपल्या जीवनात आचरणात आणण्याचा प्रयत्न करणारा नेता म्हणजे यशवंतराव होते. माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील म्हणाले, अप्रतिम वक्तृत्व आणि अफाट वाचन असणाऱ्या यशवंतरावांची कामगिरी अतुलनीय आहे. कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, नीतिमूल्यांबद्दल अत्यंत आग्रही असणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांनी तितक्याच सचोटीने विविध क्षेत्रांत कार्य केले. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. पाटील म्हणाले, चिरंतन विचार देणारा हा ग्रंथ असून डॉ. आनंद पाटील यांनी एक वेगळा ग्रंथ लिहिला आहे. कार्यक्रमात लेखक डॉ. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)
वैचारिक, तत्वज्ञानदृष्ट्या समृद्ध
ज्येष्ठ पत्रकार कुवळेकर म्हणाले, स्वखर्चाने आठ हजारांहून अधिक ग्रंथ खरेदी करून त्यांचे वाचन करणारा आणि त्यातून प्राप्त ज्ञानाचा आपल्या राष्ट्रासाठी वापर करणारा यशवंतरावांसारखा दुर्मीळ नेता आपल्याला लाभला. यशवंतरावांनी त्यांच्या हयातीत अनेक मोठमोठी पदे भूषविली. त्यातून ते आर्थिकदृष्ट्या श्रीमंत झाले नाहीत. तथापि, वाचनामुळे ते वैचारिक आणि तत्त्वज्ञानदृष्ट्या मात्र अत्यंत समृद्ध झाले.