यशवंतराव मोहिते यांच्या स्वप्नांचा चुराडा
By admin | Published: April 16, 2015 11:36 PM2015-04-16T23:36:37+5:302015-04-17T00:13:50+5:30
इंद्रजित मोहिते : ‘कृष्णा’ दिवाळखोरीत निघाल्याने डोळे पाणावतात
इस्लामपूर : माझे वडील, ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांनी कृष्णाकाठावरील जिरायती पिकावर जगणाऱ्या शेतकऱ्यांना सधन करण्यासाठी सहकारी तत्त्वावर कृष्णा साखर कारखान्याची स्थापना केली. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कारखान्याची भरभराटही झाली. पाणीपुरवठा योजना मोठ्या प्रमाणात राबविल्याने परिसर सुजलाम् सुफलाम् झाला. परंतु आमच्या घराण्यातील युवा पिढीतील अहंपणा आमच्याच अंगलट आला आहे. सध्या कृष्णा कारखान्याची दिवाळखोरीकडे वाटचाल चालू आहे. हे पाहून माझे डोळे पाणावतात, अशी भावनिक प्रतिक्रिया कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.डॉ. मोहिते यांनी रयत पॅनेलच्या माध्यमातून ‘कृष्णा’च्या आगामी निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘लोकमत’शी गप्पा मारल्या. ते म्हणाले की, सध्या ‘कृष्णा’ची अवस्था बिकट आहे. हा कारखाना वाचवायचा असेल, तर सत्ताबदल गरजेचा आहे. आमच्या घराण्यात प्रत्येकाचा ‘इगो प्रॉब्लेम’ झाला आहे. मुळात मीच सत्ताधीश, अशी भावना झाल्याने आमची कारखान्यावरील सत्ता गेली. बाह्यशक्तींनी याचा फायदा उठवत आमच्यात मोठी दरी निर्माण केली आहे. सध्याची ‘कृष्णा’ची अवस्था पाहता, डोळ्यात पाणी येते. रात्रीची झोपही उडाली आहे.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आगामी निवडणुकीत मदत करणार का? याबाबत विचारले असता डॉ. मोहिते यांनी होकारार्थी उत्तर दिले. मी स्वत: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर कायमस्वरूपी सदस्य असल्याने पवार यांच्याशी वरचेवर संपर्क असतो. माझी कामाची पध्दत पाहून पवार माझ्यावर खूश आहेत. आ. जयंत पाटील, शिराळ्याचे माजी आमदार मानसिंगराव नाईक, कऱ्हाडचे आमदार बाळासाहेब पाटील, कडेगावचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, कुंडलचे अरुण लाड यांना लवकरच भेटून भूमिका स्पष्ट करणार आहे, असे ते म्हणाले. (वार्ताहर)