यात्रेमुळे एस. टी. ‘सुसाट’
By admin | Published: February 12, 2015 12:03 AM2015-02-12T00:03:41+5:302015-02-12T00:23:22+5:30
सौंदत्तीसाठी यंदा रेकॉर्ड ब्रेक बुकिंग : पंढरपूर यात्रेतून दीडकोटीचे उत्पन्न
प्रदीप शिंदे - कोल्हापूर -महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एस.टी.च्या प्रवासी सेवेला घरघर लागल्याने तिचे आर्थिक उत्पन्न कमी होत आहे, अशी ओरड सगळीकडे सुरू आहे. मात्र, एस. टी. महामंडळाचा कोल्हापूर विभाग याला अपवाद ठरत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांनी विविध यात्रांसाठी एस.टी.लाच पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. यंदा जानेवारी महिन्यात झालेल्या पंढरपूर यात्रेतून कोल्हापूर विभागाला एका यात्रेमधून एक कोटी ४० लाख रुपये उत्पन्न मिळाले. तेच उत्पन्न गतवर्षी ६५ लाख इतके होते; तर सौंदत्ती यात्रेसाठी यंदा रेकॉर्ड ब्रेक बुकिंग झाले आहे.
महामंडळाची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. तथापि, प्रवाशांची सेवा करतानाही हे महामंडळ तोटा भरून काढण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करीत होते. यामध्ये महामंडळातील कोल्हापूर विभाग हा तोटा कमी करण्यासाठी आपल्या विभागात नावीन्यपूर्ण उपाययोजना राबवीत आहे. प्रवाशांचे एस.टी.शी नाते अधिक दृढ करण्यासाठी जानेवारीपासून सध्या सुरू असलेल्या विविध यात्रांसाठी गतवर्षीपेक्षा यंदा एस.टी.च्या प्रवासी संख्येत दुपटीने वाढ झाल्याने या यात्रेमधून कोट्यवधींचे उत्पन्न कोल्हापूर विभागाने मिळविले आहे; तर प्रवासी संख्या वाढविण्यामध्ये कोल्हापूर विभाग यशस्वी झाला आहे.
फेब्रुवारीत गडहिंग्लज येथील काळभैरी यात्रेतून ३ लाख ४९ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षी याच यात्रेतून ३ लाख ३० हजारांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा ४३ हजार २५५ प्रवाशांनी गाड्यांचा लाभ घेतला. यासह कर्नाटक सीमेवरील दड्डी (ता. चंदगड) येथील यात्रेतून १ लाख ४३ हजार २३४ रुपयांचे उत्पन्न मिळाले. गतवर्षीपेक्षा या दोन्ही यात्रांमध्ये पाच हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रवास करीत एस. टी.ला पसंती दिली. पौर्णिमा यात्रेनिमित्त नृसिंहवाडी व जोतिबा यात्रेसाठी एक लाख आठ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. यंदा एस.टी.ला पहिली पसंती दिली. ही विश्वासार्हता कायम ठेवल्यास तोट्यातील एस. टी. नक्कीच पुन्हा फायद्यात येण्यास वेळ लागणार नाही.
कर्नाटक एस.टी. ‘आउट’
दरवर्षी सौंदत्ती यात्रेला जाण्यासाठी महाराष्ट्रातील प्रवासी कर्नाटक एस.टी.ला पसंती देत होते. कोल्हापूर विभागाच्या वतीने केलेल्या नियोजनामुळे यंदा आजतागायत सर्वांत जास्त ७२३ गाड्यांचे बुकिंग झाले आहे. दरवर्षी साधारणपणे ४०० च्या आसपास गाड्यांचे बुकिंग होत होते. यंदा आजच्या तारखेपर्यंत ७२३ गाड्यांचे बुकिंग झाले आहे. यासह अजून पंधरा दिवस शिल्लक असल्याने सुमारे ८०० गाड्यांचे बुकिंग होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बुकिंगमध्ये कागल, राधानगरी व संभाजीनगर ही आगारे पुढे आहेत. तसेच या यात्रेमध्ये कुठेही गाडीला बिघाड होऊ नये यासाठी सौंदत्ती येथे यात्राकाळात यांत्रिकी विभागाचे कर्मचारी २४ तास तैनात ठेवण्यात आले आहेत.
एस.टी.बाबत असलेले नाते अधिक दृढ करण्यासाठी आम्ही आमच्या कर्मचारी, वाहक व चालकांमार्फत गावातील सरपंच, गावकरी यांच्याशी संपर्क साधून एस.टी. गाड्या बुकिंग करण्यासाठी विनंती केली. त्यानुसार प्रवाशांनी आम्हाला सहकार्य केले. यापाठीमागे आमचे सर्व अधिकारी, कर्मचारी, वाहक व चालक यांचे सहकार्य लाभले.
- सुहास जाधव, विभाग नियंत्रक