गावागावांतील यात्रा, उरुसाला लवकरच परवानगी;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:21 AM2021-02-07T04:21:48+5:302021-02-07T04:21:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनामुळे बंद असलेल्या गावागावांतील यात्रा व उरूस पुन्हा सुरू करण्यासंबंधी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनामुळे बंद असलेल्या गावागावांतील यात्रा व उरूस पुन्हा सुरू करण्यासंबंधी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू असून, याबाबत जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा, असे विभागीय आयुक्त कार्यालयाने शुक्रवारी सूचित केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवलेल्या पत्रात ज्या उत्सव, यात्रा मोठ्या प्रमाणात होतात त्या यात्रांना मान्यता देण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव, उपाययोजनांचा कृती आराखडा स्वयंस्पष्ट अभिप्रायासह सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
पश्चिम महाराष्ट्र फिरते व्यापारी असोसिएशनने २ जानेवारीला पालकमंत्री सतेज पाटील यांना यात्रा व उरूस सुरू करून त्या ठिकाणी स्टॉल लावण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी ४ जानेवारीला यात्रा व उत्सव सुरू करण्यास परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्याला सांस्कृतिक पार्श्वभूमी असल्याने ग्रामीण भागात अनेक यात्रा व उत्सव होतात. त्यामुळे अशा लहान यात्रा व उरूस यांना परवानगी देण्याबाबतचा निर्णय स्थानिक परिस्थिती व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा विचार करून प्रशासनाने घ्यावा तर मोठ्या यात्रांबाबतचा प्रस्ताव कार्यालयास सादर करावा, असे विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त संतोष पाटील यांनी कळवले आहे.
--