दीड वर्षातच अडीच कोटींचा रस्ता खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:17 AM2021-07-20T04:17:31+5:302021-07-20T04:17:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगरूळ : सांगरूळ-मल्हारपेठ हा रस्ता दीड वर्षापूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून दोन कोटी ५६ लाख खर्चातून करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगरूळ : सांगरूळ-मल्हारपेठ हा रस्ता दीड वर्षापूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून दोन कोटी ५६ लाख खर्चातून करण्यात आला. मात्र, आता रस्त्याची अवस्था फारच बिकट झाली असून निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे अडीच कोटी खड्ड्यात गेले आहेत. ग्रामपंचायतीने ठेकेदाराविरोधात तक्रार करूनही बांधकाम विभागाने काणाडोळा केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
साधारणत: चार किलोमीटर रस्ता, मोहरी बांधकामासह गटर्स असे कामाचे स्वरूप होते. त्यातील काही रस्ता कॉंक्रिटीकरण केला आहे, तोही निकृष्ट दर्जाचा असून हा रस्ता खचल्याने अपघाताचा धोकाही आहे. त्याचबरोबर गावठाण हद्दीत गटर्सचे कामही अपूर्णच आहे. ‘कुंभी’नदीच्या पुराचे पाणी रस्त्यावर येते म्हणून उंची वाढवून रस्ता करण्याचे ठरले होेते. मात्र, उंची न वाढवता रस्ता केल्याने पुराच्या पाण्याने महिनाभर रस्ता बंद राहतो. याबाबत काम सुरू असतानाही तक्रारी करून बांधकाम विभागाने सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने त्याचा नाहक त्रास आता ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. पाच वर्षे रस्त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबधित ठेकेदाराची असताना तेही केले जात नाही.
सरपंच सदाशिव खाडे, उपसरपंच सुशांत नाळे, सदस्य सचिन नाळे, प्रशांत नाळे, उत्तम खाडे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत नाळे, आर. डी. यादव, तलाठी एस. ए. काटकर यांनी रस्त्याची पाहणी करून संबंधित कार्यालयाला कळवले आहे.
जुन्याच मोहऱ्यांना मुलामा
अडीच कोटींच्या निविदेमध्ये २१ नवीन मोहऱ्यांचे बांधकाम होते. मात्र, केवळ चार-पाच मोहऱ्या नवीन बांधून जुन्या मोहऱ्यांनाच मुलामा देऊन पैसे उचलले आहेत.
फोटो ओळी : सांगरूळ ते मल्हारपेठ रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेची पाहणी सरपंच सदाशिव खाडे, उपसरपंच सुशांत नाळे, तलाठी एस. ए. काटकर यांनी केली. (फोटो-१९०७२०२१-कोल-सांगरुळ)