ोल्हापूरच्या साखर उताऱ्यात यंदा घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2017 12:46 AM2017-02-23T00:46:29+5:302017-02-23T00:46:29+5:30
उसाच्या वाढीचा फटका : विभागातील २९ कारखान्यांच्या हंगामाची सांगता
कोल्हापूर : उसाची कमी झालेली वाढ, अपरिपक्व उसाच्या गाळपामुळे यंदा कोल्हापूर विभागाच्या उताऱ्यात घट झाली आहे. आतापर्यंत ११.९८ टक्के उतारा आहे, विभागातील २९ कारखान्यांची धुराडी थंड झाली आहेत. त्यामुळे यात फारशी सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे.
साखर कारखान्यांचा यंदाचा हंगाम ऊस टंचाईमुळे तसा अडखळतच सुरू झाला. एफआरपी व १७५ रुपयांचा पहिला हप्ता जरी निश्चित झाला असला तरी कर्नाटकात बहुतांशी कारखान्यांनी प्रतिटन २७०० रुपये पहिली उचल दिल्याने सीमाभागातील कारखान्यांना त्याचा त्रास सहन करावा लागला. कोल्हापूर व सांगली जिल्हा अंतर्गत उसाची पळवापळवी झालीच, पण कर्नाटकातही मोठ्या प्रमाणात ऊस गेल्याने बहुतांशी कारखान्यांची फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच धुराडी शांत झाली. पाणीटंचाईमुळे उसाची वाढ कमी झाली. उसाची पळवापळव होणार म्हणून मिळेल तो ऊस गाळप करण्याचा सपाटा कारखान्यांनी लावला होता. स्थानिक उसाची वाट न पाहता मिळेल त्या ठिकाणाहून ऊस आणल्याने ताज्या उसाचे गाळप झाले नाही. या सर्वाचा फटका उसाच्या उताऱ्यावर झाला.
गेल्या हंगामात कोल्हापूर जिल्ह्यात १ कोटी ४७ लाख टन उसाचे गाळप झाले होते. साधारणत: १२.६९ टक्के साखर उतारा राहिला. सांगलीमध्ये ८० लाख टन उसाचे गाळप होऊन १२.१० टक्के उतारा राखण्यात कारखान्यांना यश आले. यंदा कोल्हापुरात ९९ लाख ४१ हजार टन, तर सांगलीमध्ये ४८ लाख ६९ हजार टन असे १ कोटी ४७ लाख टनाचे गाळप झाले आहे. विभागाचा सरासरी उतारा हा ११.९८ टक्के राहिला आहे.