यंदा स्थलांतरित, परदेशी पक्ष्यांनी पाठ फिरवली
By admin | Published: December 15, 2015 12:14 AM2015-12-15T00:14:33+5:302015-12-15T00:25:02+5:30
कळंबा तलावाला प्रदूषणाची दृष्ट : गाळाची दुर्गंधी, बेसुमार वृक्षतोडीमुळे रया गेली...
कळंबा : अथांग साचलेल्या उथळ पाण्यात फ्लेमिंगोसह हजारो पाणपक्ष्यांचे थवे, घरट्यांमध्ये चिमुकल्या पक्ष्यांचा किलबिलाट, वाऱ्याशी साद घालत किनाऱ्यावर येऊन थडकणाऱ्या लाटा, कळंबा तलावाचे काही वर्षांपूर्वीचे हे चित्र. जैवविविधतेने नटलेल्या या चित्रावर सुशोभीकरणाच्या नावाखाली उठाव न झालेल्या गाळाच्या दुर्गंधीचा, बेसुमार वृक्षतोडीचा बोळा फिरला व ‘पक्षी गेले दूर देशी’ अशी स्थिती आज निर्माण झाली. कळंबा तलाव परिसर हा एकेकाळी पशू-पक्षी, वनस्पतीबाबत अतिशय समृद्ध होता. उत्तम हवामान, मुबलक पर्जन्य, भौगोलिक स्थान व चांगल्या जमिनीमुळे येथे नंदनवन होते. त्याकाळी गावकावळा, घुबड, सुतार, पिंगळे, घार, कबूतर, गावबगळा, कोकीळ, सुगरण, गिधाड यांसारखे स्थानिक पक्षी, फ्लेमिंगो, पेंटेड स्टार्क, स्पून बिल हे परदेशी पाहुणे, याशिवाय विविध जातींच्या बदकांचा विहार पाहण्यासाठी पक्षीप्रेमींची गर्दी होत होती. पाणलोट व सायलेंट झोनमध्ये उभ्या इमारती, पेट्रोल पंप, हॉटेल्सची बांधकामे, कात्यायनी डोंगर परिसरातील वृक्षतोडीने पाण्याचा नैसर्गिक स्रोत बंद होऊन प्रदूषणात वाढ झाली. पाण्यातील फॉस्फेट वाढल्याने तलावाकाठी जलपर्णी फोफावली.पाण्याचा वापर अंघोळ, जनावरे धुण्यासाठी झाल्याने, गाळाचा उठाव न झाल्याने तलावातील जलचरांचे खाद्य कमी झाले. हे खाद्य कमी झाल्याने पक्ष्यांची संख्या घटली. तलावाकाठचे विविध प्रजातींचे वृक्ष तोडल्याने हजारोंच्या संख्येने दिसणारे स्थलांतरित पक्षी नगण्य झाले.थंडीच्या दिवसांत हजारो स्थलांतरित पक्ष्यांचे दर्शन होत असे. अनेक दुर्मीळ पाणवनस्पतींचे या तलावात अस्तित्व होते. वाढत्या प्रदूषणाने, बेसुमार वृक्षतोडीने हा वारसा नष्ट झाला. सध्या जरी सुशोभीकरणाचे काम सुरू असले, तरी शंभर वर्षांपूर्वीची जैवविविधता निर्माण करण्यासाठी आता तेवढीच वर्षे द्यावी लागतील.++
तलावाकाठी पूर्वी तब्बल २०० प्रकारच्या प्रजातींचे पक्षी आढळून येत होते. वाढत्या प्रदूषणाने, नागरी वस्त्यांमुळे हे प्रमाण कमी झाले आहे. तलाव संवर्धनाची जबाबदारी सामूहिकरीत्या स्वीकारल्यास येत्या काळात हे चित्र नक्की बदलेल.
- श्रद्धानंद रणदिवे,
पक्षी निरीक्षक