यंदाच्या हंगामात किमान हजार कोटींचा फटका

By admin | Published: March 18, 2017 12:58 AM2017-03-18T00:58:22+5:302017-03-18T00:58:22+5:30

साखर हंगाम आटोपला : पावणे चार कोटी टन गाळप कमी

This year, a loss of at least Rs 1,000 crore | यंदाच्या हंगामात किमान हजार कोटींचा फटका

यंदाच्या हंगामात किमान हजार कोटींचा फटका

Next

विश्वास पाटील -- कोल्हापूर --राज्यातील राज्यातील साखर हंगाम आता आटोपला असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल पावणे चार कोटी टनांचे गाळप कमी झाले. साखर उत्पादनातही ४३ लाख टनांचा फटका बसला. गतवर्षीचा विचार करता, यंदा हंगाम पन्नास टक्केच चालला. त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना किमान एक हजार कोटी रुपयांचा फटका बसला. सुरुवातीला दुष्काळामुळे उसाची वाढ कमी व नंतर जास्त पाऊस झाल्याने खुंटलेली वाढ यांचा उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला.
राज्यात यंदा ८८ सहकारी व ६२ खासगी असे १५० कारखाने सुरू होते. १३ मार्चअखेर त्यांतील १४८ कारखाने बंद झाले. त्यांनी ३७१ लाख टनांचे गाळप केले असून, त्यातून ४१ लाख टन साखर उत्पादन झाले. यंदा सरासरी साखर उतारा ११.२३ राहिला. गतवर्षीच्या तुलनेत तो पॉइंट १० ने जास्त आहे. राज्यात सुमारे दहा लाख हेक्टर क्षेत्र उसाखाली आहे. त्यात फारसा फरक न पडताही पावसाने ओढ दिल्यामुळे ऊस उत्पादनात घट झाली. पुढील हंगामातही हीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
ढोबळमानाने यंदाचा हंगाम फारसा वाद किंवा संघर्ष न होता झाला. किमान १२० दिवसांहून जास्त दिवस हंगाम झाला, तर कारखान्यांची स्थिती चांगली राहते; परंतु यंदा सरासरी हंगाम ३० ते ९० दिवस राहिला. बहुतांश कारखान्यांची नोव्हेंबरला सुरू झालेली धुराडी यंदा जानेवारीतच बंद झाली. काही कारखाने फेब्रुवारीत व अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच कारखाने मार्चमध्ये सुरू राहिले. सरासरी हंगाम, गाळप व साखर उत्पादन या तिन्ही टप्प्यांवर तो ५० टक्के कमी झाला. खोडवा पिकाची वाढच न झाल्याने यंदाच्या हंगामात मोठा फटका बसला. ऊस दिसायला चांगला होता; परंतु वजनात त्याचा फार फटका बसला. त्याचा सरासरी उत्पादनावर परिणाम झाला. एफआरपी वाढली; परंतु बाजारातील साखरेचे दर घसरल्याने शेतकरी संघटनांनीही पहिल्या उचलीसाठी फारसे ताणवून धरले नाही. कारखान्यांनी एफआरपी व जादा १७५ रुपये देण्याचे मान्य केल्यावर हंगाम सुरळीत झाला.


दृष्टिक्षेपात महाराष्ट्राचा साखर उद्योग
नोंदणीकृत कारखाने- २०२
सुरू असलेले कारखाने (सहकारी व खासगी) - १७८
ऊस उत्पादक शेतकरी - २६ लाख १२ हजार
राज्य सरकारचे भाग भांडवल- १२५३ कोटी
प्रतिदिन गाळप क्षमता- ५ लाख ५६ हजार टन
डिस्टिलरी प्रकल्प - १०१
सहवीज प्रकल्प - ७५
वीजनिर्मिती मेगावॉट - १३५४


पुढील हंगामात ६०० लाख टन गाळप व सुमारे ७२ लाख टन साखर उत्पादन असा प्राथमिक अंदाज व्यक्त झाला आहे.
या हंगामात ४६० टन गाळप व ५२ लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज होता. त्यामध्ये प्रत्यक्षात ९० लाख टन गाळप व १० लाख टन साखर उत्पादन कमी झाले.
गेल्या पाच वर्षांतील गाळप व साखर उत्पादन लाख टनांमध्ये
वर्षगाळपसाखर उत्पादन
२०१२-१३७२६७९
२०१३-१४६७६७७
२०१४-१५९३०१०५
२०१५-१६७४१८४
२०१६-१७३७१४१


पुढील हंगामातही यंदाच्या हंगामापेक्षा फार वेगळी स्थिती असेल असे नाही. मान्सून कसा लाभतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.
- विजय औताडे,
व्यवस्थापकीय संचालक,
शाहू साखर कारखाना कागल

Web Title: This year, a loss of at least Rs 1,000 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.