यंदा पाऊस दमानेच, तरीही सरासरी ओलांडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 06:00 PM2020-09-02T18:00:07+5:302020-09-02T18:01:06+5:30
गेल्या वर्षीसारखा पावसाने यंदा धुमाकूळ घातला नाही, बऱ्यापैकी ओढ दिल्यासारखेच वातावरण राहिले; तरीदेखील सप्टेंबरअखेरची सरासरी ऑगस्टच्या अखेरीलाच पावसाने ओलांडली आहे.
कोल्हापूर : गेल्या वर्षीसारखा पावसाने यंदा धुमाकूळ घातला नाही, बऱ्यापैकी ओढ दिल्यासारखेच वातावरण राहिले; तरीदेखील सप्टेंबरअखेरची सरासरी ऑगस्टच्या अखेरीलाच पावसाने ओलांडली आहे. आजअखेर सरासरीच्या ११९ टक्के पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे विध्वंसकारी महापुरापासूनही याच पावसाने वेळीच ब्रेक घेऊन दोन वेळा वाचविले आहे. चांगल्या पावसामुळे जिल्ह्यातील पीकपाणीही उत्तम असल्याने गेल्या वर्षीचे नुकसान यंदा भरून निघणार आहे.
जिल्ह्यात गेल्या वर्षी सुरुवातीला ओढ दिलेल्या पावसाने जुलैच्या मध्यानंतर मात्र चांगलाच जोर धरला. सततच्या धुवाधार बरसणाऱ्या पावसाने जिल्ह्याला प्रलंयकारी महापुराच्या दाढेत ढकलले. यंदाही असाच पाऊस बरसेल या धास्तीतच पावसाळ्याला सामोरे गेलेल्या कोल्हापूरकरांना मात्र पावसाने चांगला हात दिला आहे. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पूरस्थिती निर्माण झाली; पण वेळीच पाऊस थांबल्याने धोका टळला.