गणेशोत्सवात यंदा रस्ते राहणार खुले

By admin | Published: August 13, 2015 12:30 AM2015-08-13T00:30:03+5:302015-08-13T00:30:03+5:30

महानगरपालिकेची मार्गदर्शक तत्त्वे : पूर्ण रस्ता अडविण्यास मंडळांना बंदी; उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई

This year, the roads will be open for Ganeshotsava | गणेशोत्सवात यंदा रस्ते राहणार खुले

गणेशोत्सवात यंदा रस्ते राहणार खुले

Next

संतोष मिठारी - कोल्हापूर शहरात प्रमुख तसेच गल्ली-बोळांमधील रस्ते यंदा गणेशोत्सवात बंद राहणार नाहीत. कारण, मंडप अथवा देखाव्यांसाठी पूर्ण रस्ता अडविण्यास यावर्षी कोल्हापूर महानगरपालिकेकडून बंदी घालण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महानगरपालिकेने गणेशोत्सव मंडळांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्याच्यानुसार गणेशमूर्ती आणि देखाव्यांसाठीच्या मंडपांची उभारणी मंडळांना करावी लागणार आहे.
मंडप उभारणीसाठी महानगरपालिकेची परवानगी घेतल्यानंतर शहरातील काही मंडळे यातील अटींना बगल देत पूर्ण रस्ता अडवून ठेवतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन त्याचा शहरवासीयांना त्रास होत असतो. नागरिकांची ही समस्या लक्षात घेऊन यावर्षी महानगरपालिकेने मंडळांना मंडप उभारणीसाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. त्यात रस्त्यांत मंडप उभारताना मंडळांना आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे. शिवाय मंडळांना कोणताही रस्ता पूर्णपणे अडविता अथवा बंद करता येणार नाही.
डांबरी आणि काँक्रीटच्या नवीन रस्त्यांवर मंडप उभारणीसाठी खड्डे खोदण्यास मंडळांना मनाई करण्यात आली आहे. त्यांना रस्त्यावर खड्डे खोदण्याऐवजी वाळू अथवा काँक्रीटने भरलेली बॅरेल, फोल्डिंगच्या लोखंडी मंडपाचा करावा लागणार आहे. बस रूट, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि जास्त वर्दळ असणाऱ्या ठिकाणी गर्दी होऊन वाहतूक खोळंबणार नाही याचीदेखील
काळजी मंडळांना घ्यावी लागणार आहे. त्याचप्रमाणे ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी मंडळांना आवाजाच्या मर्यादेचेही पालन करावे लागणार आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात शहरवासीयांचा आनंद खऱ्या अर्थाने द्विगुणित होणार आहे.


महानगरपालिकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे मंडळांनी पालन करावे. रस्त्याच्या कडेला मंडळांनी मंडप घालावेत. गणेशोत्सव हा त्रासदायक ठरण्याऐवजी अधिक आनंदोत्सव होण्याच्यादृष्टीने मंडळांच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. महानगरपालिकेने उगाचच जाचक अटी लादू नयेत. मंडळांना सहकार्य करावे.
- प्रदीप कवाळे, माजी अध्यक्ष,
हनुमान तालीम मंडळ, राजारामपुरी

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उत्सवाप्रसंगी रस्त्यांवर मंडप उभारणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. याबाबतचा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर केला आहे. महासभेची मान्यता व सूचनांनुसार या प्रस्तावाची अंमलबजावणी केली जाणार आहे. मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर तहसीलदार नियुक्त समितीच्या माध्यमातून कारवाई होणार आहे.
- राजेंद्र वेल्हाळ,
वाहतूक अभियंता, महानगरपालिका


मंडळांसाठी हे महत्त्वाचे
बस रूटवरील मंडळांना किमान १२ फूट अंतर सोडावे लागणार
सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्यांवर खांब उभे करण्यासाठी वाळू
अथवा काँक्रीट भरलेल्या बॅरेलचा वापर करावा
रस्त्यांवरील विद्युत खांबावरून कनेक्शन घेता येणार नाही
मंडपापासून १५ मीटरपर्यंतच विद्युत रोषणाई करता येणार
विद्युत, दूरध्वनीच्या वाहिन्यांखाली मंडप घालता येणार नाही
निवासी क्षेत्रात सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत ५० डेसिबल आणि रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत ४० डेसिबल ही आवाजाची मर्यादा पाळावी लागणार

Web Title: This year, the roads will be open for Ganeshotsava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.